मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. कोकणात मनसेचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे आणि काही दिवसांपूर्वी पक्ष सोडणारे वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश मात्र अद्याप रखडलेला आहे.
खेडेकर यांनी शेकडो समर्थकांसह मुंबईत आगमन केले असून ४ सप्टेंबरला नियोजित असलेला पक्षप्रवेश आता आणखी दोन दिवसांनी होणार असल्याची माहिती आहे. भाजपाचे खासदार नारायण राणे यांची प्रकृती आणि मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यामुळे हा सोहळा पुन्हा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
खेडेकर यांनी प्रतिक्रिया देताना, “आज पक्षप्रवेश होणार नसल्याची कल्पना होती. तरी माझे समर्थक मोठ्या संख्येने आले होते म्हणून त्यांना घेऊन आलो. मी आधीच भाजपासाठी काम सुरू केले आहे, पक्षप्रवेश ही फक्त औपचारिकता आहे,” असे स्पष्ट केले.
आता खेडेकर काही निवडक कार्यकर्त्यांसह डोंबिवली येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर “गोड बातमी मिळू शकते,” असा सूचक इशाराही त्यांनी दिला. ४ जिल्हाध्यक्ष आणि ३५० पदाधिकाऱ्यांची यादी स्वतःसोबत आणल्याचेही त्यांनी सांगितले.
या घडामोडींमुळे खेडेकर यांचा भाजप प्रवेश नेमका कधी होतो आणि आगामी निवडणुकीच्या समीकरणांवर त्याचा कसा परिणाम होतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश पुन्हा लांबला की लांबवला? घडामोडींना वेग..!
