GRAMIN SEARCH BANNER

कोल्हापूरात दोन मंडळात तुफान मारामारी : दगडफेक, वाहनांची जाळपोळ

कोल्हापूर: शहरातील सिद्धार्थनगर उद्यानासमोर भारत तरुण मंडळाच्या राजेबागस्वार फुटबॉल क्लबच्या 31 व्या वर्धापन दिन साजरा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या डिजिटल फलकावरून वाद निर्माण झाला.

एका गटाने लक्ष्मीपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये फलक अनधिकृत असल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षक श्रीराम कणेरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस टीम घटनास्थळी दाखल झाली आणि फलक तसंच स्ट्रक्चर हटवले.

पोलिसांनी फलक हटवल्यानंतर, काही हुल्लडबाज तरुणांनी पुन्हा तो फलक उभारण्याचा प्रयत्न केला. वाद विकोपाला गेल्यामुळे दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण झाला, यावरूनच दोन गटांमध्ये मध्यरात्री तुफान मारामारी आणि दगडफेक झाली.

मध्यरात्री गटाचे कार्यकर्ते एकत्र जमल्यानंतर परिस्थिती आणखी तणावपूर्ण झाली. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. यामध्ये अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालं. घटनास्थळी त्वरित पोलीस दाखल झाले, परंतु त्यांच्याही समोरही जमाव आक्रमक आणि हिंसक झाला. पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

सिद्धार्थनगर घडलेल्या दंगलीमध्ये दोन्ही गटांचे सुमारे 200 कार्यकर्ते एकमेकांवर चाल करून गेले, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर प्रचंड दगडफेक झाली, यामध्ये अनेक चारचाकी आणि दुचाकी वाहनांचं मोठं नुकसान झालं. तसेच, काही गाड्यांना पेटवून देण्याचा प्रयत्नही करण्यात आला.

घटनास्थळी फक्त काही मोजकेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते, आणि पोलिसांसमोरच दंगलखोरांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांवरही दगडफेक केली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांच्यासह उप अधिक्षक तानाजी सावंत वरिष्ठ पोलीस अधिकारी कळमकर, आणि पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही गटांतील प्रमुख कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. सुमारे तासभर चाललेल्या या धुमश्चक्रीत अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

Total Visitor Counter

2474805
Share This Article