रत्नागिरी: रत्नागिरी-काळबादेवी मार्गावर १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एका भरधाव एस.टी. बसने मोटारसायकलला धडक देऊन घराच्या बांधाला नुकसान पोहोचवल्याची गंभीर घटना घडली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास रत्नागिरीहून काळबादेवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर, घर क्रमांक ५७२ च्या अंगणासमोर हा अपघात झाला. एम.एच. २० बी.एल. १५८१ या क्रमांकाची एस.टी. बस घेऊन जाणारा चालक लक्ष्मण कुंडलीक फड (वय ४३, रा. द्वारकानगर महालक्ष्मी नगर, रत्नागिरी) याने आपल्या ताब्यातील बस अत्यंत हयगईने, निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने चालवली.
बसवरील नियंत्रण सुटल्याने चालकाने रस्त्याच्या कडेला असलेल्या एम.एच. ०८ ए.के. ९७८५ या क्रमांकाच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले. इतकेच नाही तर बस थेट पुढे सरकत एका घराचा बांध (भिंत) तोडून आत घुसली, ज्यामुळे घराचेही नुकसान झाले.
या घटनेनंतर स्थानिक नागरिक स्नेहल सनिल वारेकर (वय ३६, रा. नवानगर काळबादेवी, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी १४ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १०.२७ वाजता गुन्हा दाखल केला.
एस.टी. बस चालक लक्ष्मण कुंडलीक फड याच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१ (निष्काळजीपणे वाहन चालवणे) आणि ३२४(४) (इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणे), तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ (धोकादायकपणे वाहन चालवणे) नुसार एम.आर. क्र. १९०/२०२५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी एस.टी. बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास सुरू आहे. भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे झालेल्या या अपघातामुळे रस्त्यावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. नागरिकांनी सार्वजनिक वाहतूकदारांनी अधिक जबाबदारीने वाहने चालवावी, अशी मागणी केली आहे.