GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी खून प्रकरण; प्रेम प्रकरणातून मामानेच केला भाच्याचा खून

Gramin Varta
24 Views

रत्नागिरी रेल्वे स्थानकातून 4 तासातच दोघांच्या मुसक्या आवळल्या, पोलिसांचे कौतुक

रत्नागिरी: शहरातील मिरकर वाडा खडक मोहल्ला येथे एका मोबाईल शॉपीच्या फर्निचरचे काम सुरू असताना कामगारांमध्ये झालेल्या वादामुळे एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून, प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिरकरवाडा येथील खडक मोहल्ला परिसरात एका नव्याने सुरू होणाऱ्या मोबाईल दुकानाचे फर्निचरचे काम गोरखपूर येथील चार कामगार करत होते. या कामगारांमध्ये प्रिन्स सहानी आणि त्याचा चुलत मामा यांचा समावेश होता. त्यांच्यात गावातील एका मुलीच्या प्रेमप्रकरणावरून वाद सुरू होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात मामाने सुतारकामासाठी वापरण्यात येणारे धारदार हत्यार (आरी) भाच्याच्या छातीत खुपसले. या वर्मी घावामुळे प्रिन्सचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर आरोपीने तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना कळवण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी एक पथक घटनास्थळी तर दुसरे पथक रेल्वे स्थानकावर पाठवले. पोलिसांनी रेल्वे स्थानकावरून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन संशयितांना ताब्यात घेतले. या संशयितांचे मोबाईल लोकेशन पोलिसांना मिळाल्याने त्यांना पकडणे सोपे झाले.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. गावातील नाजूक विषयातून हा खून झाल्याची माहिती पुढे येत आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे मिरकर वाडा परिसरात तणावाचे वातावरण असून, स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. लवकरच या गुन्ह्याचा छडा लागेल अशी अपेक्षा आहे.

Total Visitor Counter

2645682
Share This Article