खेड: कौटुंबिक वादातून झालेल्या हाणामारीत एका कुटुंबातील सदस्यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खेड पोलिसांनी पाच जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कुरवळ, खेड येथे घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर येथे राहणाऱ्या रसिका समीप हुंबरे (वय ३५) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी रसिका हुंबरे आणि त्यांचे कुटुंब १ सप्टेंबर रोजी कुरवळ येथील मूळ गावी आले होते. देवभेटीचा कार्यक्रम आटोपून ते घरी परतले असताना त्यांचा दीर अमोल हुंबरे आणि त्याची पत्नी आदिती हुंबरे यांच्यासह दीपक सखाराम उत्तेकर, साई पांडुरंग उत्तेकर आणि संदेश विचारे यांनी अचानक त्यांच्या घरात प्रवेश केला.
यावेळी मागील कौटुंबिक वादाच्या रागातून आरोपींनी रसिका यांचे पती समीप हुंबरे यांना मारहाण केली. आरोपी दीपक उत्तेकर यांनी त्यांच्या हाताच्या बोटाला चावा घेतला, तर साई उत्तेकर यांनी सोबत आलेल्या मयूर सतपाळ यांच्या पाठीवर काठीने मारहाण करून त्यांचा चष्मा फोडला. एवढेच नाही तर त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेनही तोडून नुकसान केले. आदितीचा मामा संदेश विचारे याने रसिका यांच्या सासू नीता हुंबरे यांना हात पिळगून ढकलून दिले. त्यामुळे त्यांना कमरेला व पायाला मुका मार लागला.
या हाणामारीदरम्यान आदिती हुंबरे शिवीगाळ करत असताना दीर अमोल हुंबरे यांनी रसिका यांच्या पाठीवर हाताने मारहाण केली. या घटनेनंतर, ‘तुम्ही सणानिमित्त पुन्हा गावाकडे आलात तर तुम्हाला जिवे ठार मारू’, अशी धमकीही आरोपींनी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या गंभीर गुन्ह्याप्रकरणी खेड पोलिसांनी भा.न्या.सं. कलम १८१(२), १९१(३), १९०, ३३३, रूर४(८), पीपी४(२) आणि ३५१(२) या कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.





