GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : साठरे बांबर येथे गुरांची चोरटी वाहतूक उघड; ८ लाखांच्या मुद्देमालासह दोघांवर गुन्हा

Gramin Varta
619 Views

रत्नागिरी: रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर ग्रामीण पोलिसांनी साठरेबांबर येथे धडक कारवाई केली. गुरुवारी दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी टेम्पोसह चार बैल असा सुमारे ८ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथील दोघा तरुणांवर प्राणी छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऋषीकेश दिलीप खोंगे (वय २६) आणि अविनाश सुरेश गोसावी (वय २३, दोघे रा. शाहूवाडी, कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांना रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरून गुरांची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे ग्रामीण पोलिसांनी पालीजवळील साठरेबांबर येथे सापळा रचून वाहनांची तपासणी सुरू केली.

गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास संशयित टेम्पो (एमएच ०९, जीजे ५५८५) तेथे आला असता पोलिसांनी तो थांबवून तपासणी केली. यावेळी टेम्पोमध्ये चार गावठी बैल क्रूरपणे कोंबल्याचे आढळून आले. याबाबत चालक आणि त्याच्या साथीदाराकडे विचारपूस केली असता, त्यांच्याकडे जनावरांच्या वाहतुकीचा परवाना किंवा कोणतीही वैध कागदपत्रे आढळून आली नाहीत. पोलिसांनी तात्काळ टेम्पो आणि चार गुरांसह ८ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संशयितांविरुद्ध प्राणी छळ प्रतिबंधक कायदा १९६० चे कलम ११ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3199474
Share This Article