GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत अज्ञात चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
101 Views

रत्नागिरी: शहरातील मिऱ्या-नागपूर हायवेवर जे.के. फाईल बसस्टॉपजवळील पुलावर एका अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार सचिन चंद्रकांत खेत्री (वय २५, रा. क्रांतीनगर झोपडपट्टी) हे जखमी झाले असून, धडक दिल्यानंतर अज्ञात चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन खेत्री हे २२ मार्च रोजी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यातील ॲक्सेस दुचाकीने (क्रमांक एम.एच. ०८ बी.एच. ६२६०) रत्नागिरी रेल्वे स्टेशनकडून साळवी स्टॉपच्या दिशेने जात होते. पोस्ट ऑफिससमोरील पुलावर सध्या काम सुरू असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. याच दरम्यान साळवी स्टॉपकडून कुवारबावच्या दिशेने जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या अज्ञात चारचाकी वाहनाने समोरून येणाऱ्या सचिन यांच्या दुचाकीला उजव्या बाजूने जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की सचिन खेत्री दुचाकीवरून खाली कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला मागील बाजूस गंभीर मार लागला असून डाव्या डोळ्याजवळ, हाताला आणि दोन्ही पायांना खरचटून दुखापत झाली आहे.

अपघातानंतर संबंधित अज्ञात चालक मदतीसाठी न थांबता आपल्या वाहनासह तेथून वेगाने निघून गेला. जखमी सचिन खेत्री यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून २३ मार्च रोजी पहाटे याप्रकरणी पोलीस ठाण्यात रीतसर नोंद करण्यात आली. रत्नागिरी शहर पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ) सह मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ७६/२०२६ नुसार दाखल केला आहे. पोलीस आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने त्या पांढऱ्या रंगाच्या वाहनाचा शोध घेत आहेत.

Total Visitor Counter

3203545
Share This Article