रत्नागिरी (प्रतिनिधी):शहरातील मिरकरवाडा परिसरात फर्निचरचे काम सुरू असताना एका भीषण अपघातात तरुण मजूर गंभीर जखमी झाला आहे. ग्राइंडरचा वापर करून दरवाजा कापण्याचे काम करत असताना अचानक यंत्रावरील ताबा सुटल्याने ते थेट पायावर गेले. या दुर्घटनेत शरीफउल अनादअली इस्लाम (वय २८, रा. मिरकरवाडा, मूळ राहणार रत्नागिरी) हा तरुण रक्तबंबाळ झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मिरकरवाडा येथे घडली. शरीफउल हा २५ फेब्रुवारी रोजी ग्राईंडरने दरवाजा कापत होता. काम करत असताना अचानक ग्राईंडर त्याच्या डाव्या पायावर आदळल्याने तो खोलवर कापला गेला. ग्राइंडर जोराने लागल्यामुळे शरीफउल याला मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. घटनेनंतर त्याला तातडीने उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, जखम खोल असल्याने आणि झालेला अतिरक्तस्त्राव पाहता, डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. सध्या त्याच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.





