शेतकऱ्यांचे दोन लाखांचे नुकसान
लांजा : लांजा तालुक्यातील हसोळ येथे रविवारी (७ सप्टेंबर) पहाटे बिबट्याने गोठ्यात शिरून हल्ला चढवला. या हल्ल्यात तब्बल ११ शेळ्या ठार तर एक शेळी गंभीर जखमी झाली. या घटनेत शेतकऱ्यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर वसंत आग्रे (रा. आडवली) आणि सचिन आनंद कांबळे (रा. हसोळ) यांच्या शेळ्या हसोळ गावातील कांबळे यांच्या घरापासून जवळच असलेल्या गोठ्यात बांधल्या होत्या. पहाटे साडेतीनच्या सुमारास बिबट्याने या गोठ्यावर धाड टाकली. त्यात ११ शेळ्यांचा जागीच बळी गेला.
दरम्यान, सचिन कांबळे हे आजारी असल्याने सकाळी लांजा येथे डॉक्टरांकडे गेले होते. दुपारी घरी परतल्यानंतर गोठ्यातील शेळ्या चारण्यासाठी गेल्यावर त्यांना हा प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच लांजा वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत शेळ्यांची पाहणी करून पंचनामा केला.
या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, वनविभागाकडून तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
लांजा : हसोळ येथे बिबट्याचा धुमाकूळ; गोठ्यातील ११ शेळ्या ठार
