कोल्हापूर : किल्ले विशाळगड येथील दंगल प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रवींद्र दिलीप पडवळ याला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला बुधवारी न्यायालयासमोर उभे केले असता ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
गतवर्षी जुलै महिन्यात शाहूवाडी तालुक्यातील किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याची मागणी करीत शेकडोच्या संख्येने गडप्रेमी जमले होते. या घटनेला हिंसक वळण लागून जमावाने विशाळगड व पायथ्याशी असलेल्या गजापूर गावात जाळपोळ केली. या दंगलीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी रवींद्र पडवळ, कोल्हापुरातील बंडा साळुंखे यांच्यासह शेकडो लोकांवर गुन्हा दाखल केला होता. पडवळ याच्या तपासासाठी आठ पथके तैनात होती; परंतु तो हाती लावला नव्हता.
या घटनेनंतर चार महिन्यांनी कणेरी मठ येथे झालेल्या एका कार्यक्रमात पडवळ याने रामगिरी महाराज आणि अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे पडवळ याने स्वतःच समाजमाध्यमात याबाबतची छायाचित्रे अग्रेषित केली होती. पोलीस बंदोबस्त असतानाही पडवळ पोलिसांच्या नजरेला कसा आला नाही, असा प्रश्नही या वेळी उपस्थित करण्यात आला होता.
दरम्यान, पोलीस पडवळच्या शोधात होते. त्याला आज कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार शर्मा व शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी सांगितले. विशाळगडावरील अतिक्रमणाचा वाद बराच जुना आहे. गेल्या वर्षी विशाळगडाच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेत हिंसाचार झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १४ जुलैपासून अतिक्रमण काढण्यास प्रशासनाने सुरुवात केली.
हेही वाचाkolhapur Water Supply :कोल्हापूरकरांचा गणेशोत्सव कोरडा; पोलीस बंदोबस्तात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ
चार दिवस ही कारवाई सुरू होती. या कारवाईत गडावरील ९४ अतिक्रमणे प्रशासनाने, तर नागरिकांनी स्वतःहून १० अतिक्रमणे हटवली होती. काही जणांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर न्यायालयाने पावसाळा संपेपर्यंत निवासी अतिक्रमण काढू नका, त्यानंतर कारवाई करा, असा आदेश दिला होता. पुढे, अतिक्रमणमुक्त विशाळगडाच्या मोहिमेला गेल्या वर्षी हिंसक वळण लागल्यानंतर विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली होती.
न्यायालयाच्या सूचनांचे पालन करत अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली. दरम्यान, विशाळगड दंगलीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झालेले होते. याप्रकरणी विरोधकांनी राज्य शासनाने ही दंगल घडवल्याचा आरोप केला होता. तर, राजकीय आकसातून आरोप होत असल्याचे प्रत्युत्तर सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आले होते.
विशाळगड दंगलप्रकरणी मुख्य संशयित रवींद्र पडवळ याला अटक
