GRAMIN SEARCH BANNER

मच्छीमार व्यावसायिक 1 ऑगस्टपासून खोल समुद्रात जाणार

Gramin Varta
7 Views

मुंबई: मासेमारीवर बंदी असल्यामुळे मच्छिमार व्यावसायिक अडचणीत आले होते. आता मात्र लवकरच ही बंदी उठणार असल्यामुळे मच्छिमार बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एक जूनपासूनच्या मासेमारी बंदीनंतर आता 1 ऑगस्टपासून खोल समुद्रातील पावसाळी मासेमारीला सुरुवात होणार आहे.

मात्र, 15 दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाही मच्छीमारांची बोटी दुरुस्ती व तयारीसाठी आतापासूनच लगबग सुरू झाली आहे. यामुळे करंजा, मोरा, ससून डॉक बंदरात मच्छीमारांची गर्दी दिसत आहे.

खोल समुद्रातील मासेमारीसाठी मच्छीमारांना 50 ते 70 वाव खोल समुद्रात जावे लागते. त्यासाठी एका ट्रीपसाठी 10 ते 12 दिवस खर्ची घालावे लागतात. मासेमारीच्या एका ट्रीपसाठी दीड ते दोन लाखांपर्यंत खर्च मच्छीमारांना येतो. 50 वाव खोल समुद्रात मच्छीमारी केली जाते. खोल समुद्रातील (डीप फिशिंग) मासेमारीसाठी 15 दिवस आधीपासून तयारी सुरू झाली आहे. बोटींच्या डागडुजी, रंगरंगोटी, जाळींची दुरुस्ती करण्यासाठी मच्छीमारांची लगबग सुरू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर डिझेलचा कोटा वेळेत मिळावा अशी मागणी मच्छिमार बांधवांनी शासनाकडे केली आहे. पावसाळी 61 दिवसांच्या बंदीनंतर एक ऑगस्टपासून सुरू होणार्‍या मासेमारीसाठी मच्छीमार आसुसलेले आहेत. यासाठी मच्छीमारांना शासनाकडून मिळणारा डिझेलचा कोटा वेळेतच उपलब्ध होणे आवश्यक आहे. असे सामाजिक कार्यकर्ते तथा व्यावसायिक सीताराम नाखवा यांनी सांगितले. तर आतापासूनच बैठका घेऊन निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, शासनाकडून डिझेल कोटाबाबत निर्णय होत नसल्याने आता वेळेत डिझेल कोटा मिळाला नाही तरी बाहेरून मिळणारे महागडे डिझेल खरेदी करून 1 ऑगस्टपासून मासेमारीसाठी निघण्याची तयारीही मच्छीमारांची असल्याची माहिती करंजा मच्छीमार संस्थेचे माजी उपाध्यक्ष तथा व्यावसायिक रमेश नाखवा यांनी दिली आहे.

Total Visitor Counter

2650976
Share This Article