खेड: वसई आणि मीरा भाईंदर येथे मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पडसाद मंगळवारी खेडमध्ये उमटले. मनसे नेते प्रकाश महाजन आणि राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत काळ्या फिती लावून शासनाचा निषेध नोंदवण्यात आला.
यावेळी मनसे नेते प्रकाश महाजन यांनी शासनाला इशारा दिला. “जर संध्याकाळपर्यंत ताब्यात घेतलेले मनसे नेते अविनाश जाधव आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडले नाही, तर पुढील रणनीती ठरवावी लागेल,” असे ते म्हणाले. मीरा भाईंदर येथे परप्रांतीय नागरिकांनी काढलेल्या मोर्चाला परवानगी दिली जाते, मात्र मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली जाते. हा शासनाचा दुजाभाव असल्याचा आरोप महाजन यांनी केला. “मोर्चा कुठून आणि कसा काढायचा, तसेच कोणत्या घोषणा द्यायच्या, हे मनसे कार्यकर्त्यांना चांगले ज्ञात आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.
या निषेध मोर्चात मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, हर्षदीप सासने, जयेश गुहागरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी बहुसंख्येने सहभागी झाले होते. पोलिसांच्या कारवाईविरोधात मनसे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप दिसून आला.