GRAMIN SEARCH BANNER

हर्णे किनाऱ्यावर पर्यटकांची हुल्लडबाजी; थेट किनाऱ्यावर गाड्या

Gramin Varta
61 Views

दापोली: निसर्ग सौंदर्याचं वरदान लाभलेला रत्नागिरी जिल्हा पर्यटन व्यवसायाने समृद्ध असला तरी, सध्या बाहेरून येणाऱ्या काही पर्यटकांमुळे येथील स्थानिकांची डोकेदुखी वाढली आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये दापोली तालुक्यातील हर्णे येथील समुद्र किनाऱ्यावर मोठ्या संख्येने आलेल्या पर्यटकांकडून पुन्हा एकदा हुल्लडबाजी आणि मनमानी कारभाराचा प्रकार उघड झाला आहे. या बेजबाबदार वर्तनामुळे हर्णे किनाऱ्याचं सौंदर्य आणि शांतता धोक्यात आली असून, स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नैसर्गिक सौंदर्य, निळाशार समुद्र आणि मत्स्यव्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या हर्णे किनाऱ्यावर पर्यटन हंगाम सुरू होताच देशभरातून पर्यटक दाखल होतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून काही पर्यटकांकडून मोठ्या आवाजात संगीत, मद्यपान करणे, किनाऱ्यावर कचरा टाकणे आणि मनमानी पद्धतीने वाहने चालवून हुल्लडबाजी करण्याचे प्रकार वाढले आहेत. हर्णे किनाऱ्यावर आपली वाहने नेऊन स्टंट करणे किंवा वेगाने चालवण्यामुळे इतर पर्यटकांना त्रास होतो आणि अपघाताचा धोकाही संभवतो. विशेष म्हणजे, भरती-ओहोटीच्या वेळापत्रकाचे ज्ञान नसल्याने अनेक पर्यटकांची वाहने भरतीच्या पाण्यात रुतून बसल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

जिल्हा पोलीस दलाने समुद्रकिनारी वाहने नेण्यास मनाई केली असतानाही, हे पर्यटक नियम धाब्यावर बसवून त्याकडे सर्रास दुर्लक्ष करत आहेत. रात्री उशिरापर्यंत गाड्यांमधून मोठ्या आवाजात गाणी लावणे, तसेच मद्यपान करून बाटल्यांचा आणि इतर कचरा किनाऱ्यावर व समुद्रात फेकण्यामुळे परिसराचं पर्यावरणीय संतुलन बिघडण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. यामुळे मत्स्यव्यवसायावरही परिणाम होत असल्याची तक्रार स्थानिक मच्छीमारांनी केली आहे.
हर्णे समुद्रकिनारा स्वच्छ आणि शांत राहावा यासाठी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन दरवर्षी प्रयत्न करत असते. स्थानिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्यानंतर पोलिसांनी काही ठिकाणी दंडात्मक कारवाई देखील केली आहे, परंतु अनेक हुल्लडबाजांवर त्याचा कोणताही परिणाम होताना दिसत नाही. ‘हर्णेचं सौंदर्य आणि शांतता टिकवायची असेल, तर पर्यटकांनी शिस्त आणि स्वच्छतेचे नियम पाळणे अत्यावश्यक आहे,’ असं आवाहन स्थानिक प्रशासन वारंवार करत आहे.

पर्यटकांसाठी हा किनारा आकर्षणाचा केंद्रबिंदू असला तरी, त्यांनी जबाबदारीने वागण्याची नितांत गरज आहे. या गंभीर समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने पुढील काही दिवसांत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्याची तयारी दर्शवली असून, हर्णे किनाऱ्याचं सौंदर्य आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्याचं नियोजन सुरू आहे. आता स्थानिक पोलीस या अशा मनमानी करणाऱ्या हुल्लडबाजांवर काय कडक कारवाई करतात, याकडे स्थानिकांचं लक्ष लागलं आहे.

Total Visitor Counter

3199514
Share This Article