राजापूर: तालुक्यातील उन्हाळे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ ची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, चार वर्गखोल्या पूर्णपणे नादुरुस्त झाल्या आहेत. त्या कधीही कोसळू शकतात अशी भीती व्यक्त होत आहे. परिणामी, सध्या एकाच वर्गखोलीत पाच वर्ग एकत्र बसवावे लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पुरता बोजवारा उडाला आहे. गेली दोन वर्षांपासून दुरुस्तीची मागणी करूनही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
एकीकडे पटसंख्येअभावी शाळा बंद करण्याच्या चर्चा सुरू असताना, उन्हाळे शाळेला चांगली पटसंख्या (सुमारे ६५ विद्यार्थी) असूनही तिच्या इमारतीच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष केले जात आहे. राजापूर शहरातील प्रसिद्ध गंगामाईच्या जवळ असलेल्या या शाळेची ही दयनीय अवस्था प्रशासनाच्या दुटप्पी धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
उन्हाळे येथील जि. प. शाळा क्र. १ ही सातवीपर्यंत असून, एकूण पाच वर्गखोल्या आहेत. त्यापैकी केवळ एक वर्गखोली (विधानसभा निवडणुकीपूर्वी दुरुस्त केलेली) सुस्थितीत आहे, तर उर्वरित चार खोल्या अत्यंत जीर्ण झाल्या आहेत. शाळेतील पाण्याची टाकीही मोडकळीस आली असून तिचा वरील भाग पूर्णपणे उडाला आहे.
या गंभीर परिस्थितीमुळे सर्व विद्यार्थी एकाच वर्गखोलीत बसून शिक्षण घेत आहेत. यामुळे शिक्षकांना अध्यापन करणे आणि विद्यार्थ्यांना एकाग्रतेने शिकणे कठीण झाले आहे, परिणामी शिक्षणाचा दर्जा खालावला आहे. गेली दोन-तीन वर्षांपासून ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ सातत्याने इमारतीच्या दुरुस्तीची मागणी करत आहेत, मात्र संबंधित विभागाकडून याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे.
“प्रशासन एखाद्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. या ठिकाणी जर काही अघटित घटना घडली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. लवकरात लवकर या शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि योग्य शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.