GRAMIN SEARCH BANNER

सावर्डे महाविद्यालयात जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त बेकरी व्यवसाय कार्यशाळा

सावर्डे : येथील कला व विज्ञान महाविद्यालयात जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त “बेकरी व्यवसायातील रोजगार संधी व केक तयार करणे” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. भारत सरकारच्या ‘माय भारत’ उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम राबवण्यात आला. या कार्यशाळेला ‘मेरा युवा भारत’ केंद्र रत्नागिरीचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक अनिकेत जाधव प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री. कांबळे सर होते. तसेच श्री. चवरे सर, NSS विभागप्रमुख श्री. जाविर सर, WDS विभाग प्रमुख सौ. शेंबेकर मॅडम आणि महाविद्यालयातील अन्य शिक्षकवर्ग यावेळी उपस्थित होता.

कार्यक्रमाची सुरुवात सौ. शेंबेकर मॅडम यांच्या प्रस्तावनेने झाली. त्यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करत विद्यार्थ्यांना जागतिक युवा कौशल्य दिनाचे महत्त्व आणि या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर प्राचार्य श्री. कांबळे सर यांनी कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, कुशल कामगार हा प्रत्येक यशस्वी उद्योगाचा पाया असतो.

या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सावर्डे येथील के के बेकर्सचे मालक किरण कातकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या व्याख्यानात युवकांनी उद्योग आणि व्यवसायाकडे वळण्याची गरज, नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बनण्याचे महत्त्व, कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्याच्या शक्यता, तसेच बेकरी व्यवसायातील विविध रोजगार संधी यावर सखोल मार्गदर्शन केले. घरगुती पातळीवर केक तयार करून त्याचा व्यवसाय कसा करता येतो, हे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.

व्याख्यानानंतर कातकर सरांनी विद्यार्थ्यांसमोर प्रत्यक्ष केक तयार करून दाखवला. केक बनवताना लागणारे साहित्य, ओव्हनचे तापमान, उपकरणांची निवड, स्टेशनरी साहित्य यांची माहिती दिली. तसेच केक कटिंग, लेअरिंग, क्रिमिंग आणि डिझायनिंग यासारख्या प्रक्रियांचे सविस्तर प्रात्यक्षिक करून दाखवले. विद्यार्थ्यांनी स्वतःही केक बनविण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या उपक्रमात महाविद्यालयातील ४० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी किरण कातकर सरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. NSS विभागप्रमुख श्री. जाविर सर यांनी महाविद्यालयाच्या वतीने ‘मेरा युवा भारत’ रत्नागिरी स्वयंसेवकांचे आभार मानले आणि अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही राबवण्याची इच्छा व्यक्त केली.

Total Visitor Counter

2455621
Share This Article