नाणीज : नाणीजक्षेत्री भर पावसातही जमलेली भाविकांची प्रचंड गर्दी गुरूपूजनाचा आनंदसोहळा अनुभवणार आहे. जगद्गगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजीयांचे पूजन, दर्शन, त्यांचे अमृतमय प्रवचन सारे काही भक्तांसाठी एक पर्वणी असते. (१० जुलै) कार्यक्रमासाठी सुंदरगड भाविकांनी फुलून गेला आहे. बुधवारी सकाळी याग व वाजत गाजत निघालेल्या निमंत्रण मिरवणुकांनी या वारी उत्सव सोहळ्याची जोरदार सुरुवात झाली.
काल सकाळी मंत्रघोष सुरू झाला. त्यानंतर सप्तचिरंजीव महामृत्यूंजय यागाने ख-या अर्थाने सोहळा सुरू झाला. त्यानंतर सकाळी ११ पासून देवदेवतांना सोहळ्याची निमंत्रणे देणा-या मिरवणुका सुरू झाल्या. सुंदरगडावरील संतशिरोमणी गजानन महाराज मंदिरापासून अन्य मंदिरांकडे या मिरवणुका स्वतंत्रपणे सुरू झाल्या. भर पावसात निघालेल्या या मिरवणुकांतील भाविकांचा उत्साह अवर्णनीय होता. ढोल – ताशांचा गगनभेदी आवाज, त्याच्या जोडीला भाविकांचा जयघोष, रांगेने चाललेले कलशधारी, निशाणधारी स्री-पुरूष अशा गर्दीत या मिरवणुका काढण्यात आल्या.
नाणीजक्षेत्री याग, निमंत्रण मिरवणुकांनी गुरुपौर्णिमा सोहळा सुरू
