मुंबई: पोलादपूर महाराष्ट्र शासनाने कोकणातील शेतकरी वर्गाच्या दीर्घकालीन मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. भरत गोगावले यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे सामाईक ७/१२ धारक शेतकऱ्यांनाही हमीपत्राद्वारे वैयक्तिक शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे.
कोकणातील बहुतांश शेतजमिनी या सामाईक स्वरूपाच्या असून त्यावर एकापेक्षा अधिक खातेदारांची नावे आहेत. यामुळे खातेफोड न झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी आवश्यक असलेली संमती मिळवणे कठीण होते. परिणामी, हे शेतकरी विविध योजनांपासून वंचित राहत होते.
भात हे कोकणातील प्रमुख पीक असून, पावसावर आधारित शेतीमुळे उत्पन्न कमी असते. परिणामी, मोठ्या प्रमाणावर स्थलांतर घडते. यावर उपाय म्हणून राज्य सरकार रोजगार हमी योजना, फलोत्पादन अभियान, तसेच कृषीविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करीत आहे. मात्र, सामाईक सातबाऱ्यांमुळे अडचणी निर्माण होत होत्या.
या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस रोजगार हमी मंत्री नामदार भरत गोगावले तसेच कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, महसूल सचिव, कृषी विभागाचे उपसचिव, रोजगार हमी योजनांचे सचिव, महासंचालक तसेच आमदार उपस्थित होते. या बैठकीत कोकणातील सामाईक सातबाऱ्यांच्या बाबतीत हमीपत्राद्वारे योजनांचा लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, महसूल मंत्री बावनकुळे यांनी या निर्णयासाठी तीन दिवसांत शासन निर्णय (GR) काढण्याचे आदेश सचिवांना दिले. यामुळे कोकणातील हजारो शेतकऱ्यांना आता खातेदारांची संमती न घेता हमीपत्राद्वारे योजनांचा लाभ मिळणार आहे.
या निर्णयामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असून, नामदार भरत गोगावले यांचे यामध्ये मोलाचे योगदान असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कोकणातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे.
कोकणातील सामाईक ७/१२ धारक शेतकऱ्यांना हमीपत्राद्वारे शासकीय योजनांचा लाभ मिळणार
