लांजा: “रद्द करा, रद्द करा, डंपिंग ग्राउंड रद्द करा!”, “कोण म्हणतंय करणार नाही, केल्याशिवाय राहणार नाही!”, “डंपिंग ग्राउंड हद्दपार झालाच पाहिजे!” अशा गगनभेदी घोषणांनी लांजा शहर परिसर मंगळवारी (8 जुलै) दणाणून सोडण्यात आला. लांजा नगरपंचायतीकडून कोत्रेवाडी येथे राबवण्यात येत असलेल्या प्रस्तावित डंपिंग ग्राउंड प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी कोत्रेवाडी ग्रामस्थ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले. सायंकाळी पाच वाजता लांजा तहसीलदार कार्यालयात यासंदर्भात निवेदनही देण्यात आले.
लांजा नगरपंचायतीने कोत्रेवाडी येथे, रहिवासी वाडीवस्त्यांलगतच डंपिंग ग्राउंड प्रकल्प उभारण्याचा घाट घातला आहे. शासकीय नियम धाब्यावर बसवून आणि जोरजबरदस्तीने हा प्रकल्प राबवला जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी गेल्या चार वर्षांपासून या विरोधात लढा पुकारला आहे. यापूर्वीही अनेक आंदोलने आणि उपोषणे करण्यात आली आहेत. मात्र, तरीही लांजा नगरपंचायत प्रशासनाने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात या डंपिंग ग्राउंडसाठी जागा खरेदी केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांचा तीव्र विरोध डावलून हा प्रकल्प रेटून नेण्याचा नगरपंचायत प्रशासनाचा डाव असल्याचा आरोप करत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेतृत्वाखाली कोत्रेवाडी ग्रामस्थांनी मंगळवारी लांजा तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.
या उपोषणाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्ता कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, महिला उपजिल्हा संघटिका उल्का विश्वासराव, लांजा तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, शिव सहकार सेनेचे जिल्हा संघटक चंद्रकांत शिंदे, पक्षाचे नेते भाई विचारे, जिल्हा सरचिटणीस परवेश घारे, महिला तालुका संघटिका पूर्वा मुळे, युवा सेनेचे तालुका अधिकारी अभिजीत राजेशिर्के तसेच माजी शिवसेना शहरप्रमुख नितीन शेट्ये, पप्पू मुळे, माजी नगरसेवक लहू कांबळे, विभाग प्रमुख राजू सुर्वे, विश्वास मांडवकर, पुनस सरपंच संतोष लिंगायत, सचिन लिंगायत, बाबू गुरव यांच्यासह अन्य शिवसेना पदाधिकारी, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिक, तसेच कोत्रेवाडीतील ग्रामस्थ, महिलावर्ग, पुरुषवर्ग आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याशिवाय, काँग्रेस पक्षाचे लांजा तालुका अध्यक्ष राजेश राणे, प्रभारी जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, माजी तालुकाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, माजी सचिव महेश सप्रे तसेच राष्ट्रवादी पक्षाचे बाबा धावणे आदी प्रमुख नेतेही उपस्थित होते. उपोषणादरम्यान शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, भाई विचारे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश राणे, नुरुद्दीन सय्यद, अनिरुद्ध कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना महिला जिल्हा संघटिका उल्का विश्वासराव म्हणाल्या की, “कोत्रेवाडी डंपिंग ग्राउंड प्रकल्पाविरोधात वेळोवेळी प्रशासनाला निवेदने आणि पत्रव्यवहार केलेला आहे. असे असतानाही निकषात न बसणारा हा डंपिंग ग्राउंड प्रकल्प या ठिकाणी राबवला जात आहे. काही लोकांच्या सांगण्यानुसार, येथे भ्रष्टाचार झाल्यामुळेच हा प्रकल्प लोकांच्या माथी मारला जात आहे.”
तर उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस यांनी प्रशासनाला विनंती करत म्हटले की, “अजूनही वेळ गेलेली नाही. प्रशासनाने एक तर कोत्रेवाडी येथील डंपिंग ग्राउंड प्रकल्प रद्द करावा किंवा तो अन्य ठिकाणी स्थलांतरित करावा. आमच्या पक्षाची ही लढाई केवळ उपोषणापुरती थांबणार नाही.”