GRAMIN SEARCH BANNER

संतापजनक : साखरपा येथील निराधार, विधवा महिलेवर बहिष्कार: 2 मुलांसह उदरनिर्वाहाचा प्रश्न

उमेद अंतर्गत बचत गटातील महिलांनी कटकारस्थान रचून बाहेर काढले

संगमेश्वर तहसीलदार, बिडीओ, सीइओकडून दुर्लक्ष, महिलांनी घेतलेल्या कर्जाची चौकशी करण्याची मागणी

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील निराधार विधवेवर बचत गटातील काही महिलांनी बहिष्कार टाकत तिला कर्जापासून वंचित ठेवल्याची धक्कादायक घटना संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे उघडकीस आली आहे. पतीच्या निधनानंतर दोन मुलांचा सांभाळ करत असलेल्या या महिलेला उमेद अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या बचत गटातून बाहेर काढण्यात आले आहे. यामुळे तिच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. पीडित महिलेने प्रशासनाकडे मदतीची याचना केली. निवेदने दिलेली मात्र अद्याप तिला न्याय मिळालेला नाही, ज्यामुळे जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या असंवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नेमकं काय घडलं?

- Advertisement -
Ad image

साखरपा येथील विठ्ठल रखुमाई बचत गटामध्ये गेल्या सात वर्षांपासून पीडित महिला सदस्य आहे. या पीडित महिलेने यापूर्वी ५० हजारांचे कर्ज घेऊन ते फेडले होते. पतीच्या निधनानंतर चप्पल व्यवसायासाठी तिला पुन्हा कर्जाची गरज होती. मात्र, बचत गटातील विद्या विष्णू कदम, वैभवी विकास चव्हाण, आणि वनिता वामन कदम या तीन महिलांनी वाडीतील किरकोळ भांडणाचा राग मनात धरून इतर सदस्यांना पीडित महिलेच्याविरोधात भडकवले. त्यानंतर त्या महिलेला बचत गटातून परस्पर बाहेर काढले. कोंडगाव साखरपा येथील सीआरपी सुप्रिया बेंद्रे यांनी कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देताच तिला बचत गटातून काढून टाकल्याचे पीडितेने म्हटले आहे.

ही महिला ज्या बचत गटात होती त्या गटासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी २० लाख रुपयांचा कर्ज प्रस्ताव मंजूर करून प्रत्येक महिला सदस्याला १ लाख ५३ हजार ८०० रुपये देण्याचे निश्चित केले होते. मात्र या महिलेला वगळून हे कर्ज वाटप केले जाणार होते याची कुणकुण लागल्यावर पीडित महिलेने गटविकास अधिकारी आणि रत्नागिरी येथे तक्रार केली. त्यांनी हे कर्ज थांबवले आणि सुप्रिया बेंद्रे व दिशा ग्रामसंघाच्या अध्यक्षा नेत्रा शिंदे यांना पीडितेला इतर महिलांप्रमाणेच कर्ज देण्याच्या तोंडी सूचना दिल्या. तरीही, या महिलांनी पीडितेला कोणतीही सूचना न देता गटातील चौदा महिला सदस्यांना प्रत्येकी १ लाख ५३ हजार ८०० रुपये दिले आणि तिला मात्र कर्जापासून वंचित ठेवले.

मुजोरी आणि गंभीर आरोप

पीडित महिलेने केलेल्या आरोपानुसार, संबंधित तीन महिला तिला “कुठेही जा, आमचं कोणी वाकडं करू शकत नाही. कोर्टात गेली तरी चालेल, आम्ही घाबरत नाही,” अशी मुजोरी करत आहेत. या महिलांनी उमेदच्या बचत गटाकडून कर्ज घेऊन स्वतःला गब्बर करून घेतले असल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. या महिलांच्या कर्जाची चौकशी करावी असेही तिने म्हटले आहे. गावातील जाणकार मंडळी आणि तंटामुक्त समितीलाही या महिला जुमानत नाहीत. एवढेच नव्हे, तर बीडीओपासून ते उमेदच्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच या महिलांना सामील असल्याचा गंभीर आरोपही पीडितेने केला आहे.

वडिलांची धावपळ, अधिकाऱ्यांचा निर्ढावलेपणा

- Advertisement -
Ad image

पीडित महिलेने याबाबतचे निवेदन रत्नागिरीच्या सीईओ यांना दिले आहे. मात्र, येथील अधिकाऱ्यांनी “आम्ही यावर मार्ग काढतो, 2 दिवसात संगमेश्वरहून अहवाल मागवतो,” असे सांगून तिची बोळवण केली. 1 महिना लोटला तरी त्या महिलेला उत्तर मिळालेले नाही. पीडितेचे ७५ वर्षांचे वडील, जे स्वतः अपंग आहेत, ते गेल्या वर्षभरापासून आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या पायऱ्या झिजवत आहेत. अपंग असतानाही एवढ्या पायऱ्या चढून चालत जात आहेत, मात्र, गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या आणि खुर्चीला चिकटून बसलेल्या अधिकाऱ्यांना या अपंग बापाचीही दया येत नसल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेतील यंत्रणा एवढी निगरगट्ट झाल्याचा आरोप पीडितेने आणि तिच्या वडिलांनी केला आहे.

तर माझी बदनामी कशाला?

पीडित महिलेने संगमेश्वर तहसीलदार, सीईओ, बीडीओ आणि उमेदच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तिला चप्पल व्यवसायासाठी कर्जाची तातडीने आवश्यकता आहे, कारण तिला तिच्या तीन वर्षांच्या मुलीचे आणि आठवीत शिकणाऱ्या मुलाचे पालनपोषण करायचे आहे. या तीन महिलांनी तिची बदनामी केली असून, ती शिवीगाळ करत असल्याचे खोटे आरोप करत आहेत. “मी शिव्या दिल्या असतील तर तुम्ही पोलिसांत तक्रार द्यायची, पण कर्ज का थांबवता?” असा सवाल तिने केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूच्या महिलांना समोर बसवून चौकशी न करता, केवळ त्या तीन महिलांचे ऐकून एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोपही तिने केला आहे. तिच्यावर खोटे आरोप करत तिला बचत गटातून बाहेर काढणाऱ्या महिलांची चौकशी करून, त्यांनी घेतलेले कर्ज तात्काळ वसूल करून हा बचत गट बंद करण्याची मागणी तिने केली आहे. माझ्यासारख्या अशा अनेक महिलांवर अन्याय झाला आहे, मात्र त्यांनी आजपर्यंत आवाज न उठवल्यामुळे या गोष्टी समोर आलेल्या नाहीत. अशाप्रकारे गरजू महिलांवर अन्याय होत आहे. वरिष्ठ स्तरावर याची गंभीर दखल घेऊन अशा गरीब महिलांनी नाय मिळावा यासाठी आपण लढत असल्याचे या महिलेने म्हटले आहे.

- Advertisement -
Ad image

तालुक्यातील बचत गटांची चौकशी व्हायला हवी?

अशा अनेक महिलांवर अन्याय होत आहे. गरीब महिलांना बाजूला सारून अधिकारी, ग्राम संघाच्या अध्यक्षा, सीआरपी यांच्या संगनमताने या बचत गटांमध्ये गैरव्यवहार होत आहेत. उद्योग व्यवसाय न करता कागदोपत्री फाईली रंगवून बँकेला प्रोपजल सादर करून शासनाच्या योजनेचा गैरफायदा घेत कमी व्याजदराने मिळणारे पैसे वैयक्तिक स्वार्थासाठी लाटण्याचा प्रकार आहे का ? की सदर रक्कम सावकारी करण्यासाठी वापरली जात आहे? व्याजी पैसे ही दिले जातात का ? सी आर पी, बचत गटाच्या नावाने कर्ज देणाऱ्या बँक, अधिकारी याचे हात अडकले गेले आहे का? याची निपक्षपातीपणे चौकशी होणे गरजेचे आहे.

पीडित महिला सामंत बंधूकडे धाव घेणार

देवरुख साखरपा मतदार संघातील ही पीडित महिला हैराण झाली आहे. तिचे अपंग वडील जिल्हा परिषदेत फेऱ्या मारून हतबल झाले आहेत.
साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत याची भेट घेऊन जिल्ह्याच्या बचत गटाच्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी करणार असून यात अडकलेल्या मोठंमोठ्या अधिकारांचे पितळ उघडे होणार आहे.

Total Visitor

0214477
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *