आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल; महिला संघटना आणि दक्षता समितीकडून पोलिसांचे अभिनंदन
राजन लाड/जैतापूर : महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांना वाचा फोडत आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सागरी पोलीस ठाणे, नाटे यांनी पुन्हा एकदा संवेदनशीलता दाखवत आदर्श निर्माण केला आहे. कशेळीतील दोन आरोपींविरुद्ध मोबाईलद्वारे लज्जास्पद वर्तन केल्याप्रकरणी जलदगतीने तपास करून दोषारोपपत्र दाखल केले असून, या कारवाईबद्दल परिसरातील महिला संघटना आणि महिला दक्षता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
कशेळी आगवेकरवाडीतील संतोष बबन मांडवकर (वय ४५) आणि कशेळी हळदणकरवाडीतील नरेश भिकाजी हळदणकर (वय ४९) या आरोपींनी एका तरुणीला मोबाईलवरील मेसेज व फोन कॉल करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याप्रकरणी २५ सप्टेंबर २०२५ रोजी सागरी पोलीस ठाणे, नाटे येथे गुन्हा रजि. नं. ६६/२०२५ भा.दं.सं. २०२३ चे कलम ७८(२), ७९.३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
ही बाब गंभीरतेने हाताळून मा. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. बीट हवालदार एस. एस. इंगळे यांनी तातडीने तपास सुरू करून पंचनामा पूर्ण केला. यामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व्ही. बी. चव्हाण, पोलीस हवालदार वाय. एस. हुजरे यांच्यासह संपूर्ण पथकाने सहकार्य केले. परिणामी शनिवार-रविवार वगळता अवघ्या काही दिवसांतच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
दरम्यान, नाटे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील महिला संघटना आणि महिला दक्षता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांची भेट घेत आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. त्याचबरोबर या जलद व ठोस कारवाईबद्दल पोलिसांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
“या प्रकरणी न्यायालयास जलदगतीने खटला चालविण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. महिलांविरुद्ध अशा घटना घडल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी,” असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी केले.
सागरी पोलिसांच्या या कामगिरीचे परिसरात मोठे कौतुक होत असून, या कारवाईतून महिला सुरक्षेच्या प्रश्नांवर पोलिसांची शिस्तबद्ध आणि कटिबद्ध भूमिका अधोरेखित झाली आहे.