GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणचे क्रीडाप्रेमी बाजीराव तावडे यांचे निधन

Gramin Varta
136 Views

९० च्या दशकातील राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या संयोजनात असायची महत्त्वाची भूमिका

चिपळूण : शहरातील क्रीडा क्षेत्राला मोलाची साथ देणारे, ९०च्या दशकातील राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या संयोजनात महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी बाजीराव तावडे (वय ६५) यांचे आज, मंगळवारी रत्नागिरी येथे वृद्धापकाळाने निधन झाले.

रत्नागिरीवरून बदली होऊन चिपळूणमध्ये आल्यानंतर तावडे यांनी स्थानिक क्रीडा क्षेत्रात सक्रिय सहभाग घेतला. चिपळूण तालुका कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. माजी आमदार बापूसाहेब खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्यस्तरीय सीझन बॉल क्रिकेट स्पर्धेत संयोजनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांनी पार पाडली. उत्तम यष्टीरक्षक म्हणून त्यांची क्रिकेटमधील ओळख होती. स्पर्धांचे नियोजन, संघांना आमंत्रण देणे, संघटनात्मक काम पाहणे यांत ते अग्रणी होते. सुचयअण्णा रेडीज यांच्याशी त्यांची घट्ट मैत्री होती. कॅरम, हॉलीबॉलसह इतर खेळाडूंनाही ते नेहमीच मदतीला धावून जात.

चिपळूण नगर पालिकेच्या स्विमिंग पूल उभारणीसाठी आराखडा तयार करताना देखील त्यांनी मार्गदर्शन केले होते. त्यांच्या निधनाने चिपळूणच्या क्रीडा क्षेत्राला मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी बँक ऑफ इंडियात सेवेत होत्या. बाबू तांबे, सुचयअण्णा रेडीज, सचिन कुलकर्णी यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

Total Visitor Counter

2650318
Share This Article