GRAMIN SEARCH BANNER

वडोदरा शहरात उद्योजक ओम रवेशिया यांच्या शाही विवाह सोहळ्यात देवरूखच्या विलास रहाटे यांची रांगोळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली

Gramin Varta
186 Views

देवरुख: भारतीय नामांकित स्टेशनरी, कला साहित्य, ऑफिस साहित्य ते हॉबी किटचे उत्पादक व  विक्रेती कंपनी डोम्सचे (DOMS) संचालक ओम रवेशिया यांच्या शाही विवाह सोहळ्यात देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार श्री. विलास विजय रहाटे यांनी साकारलेल्या दोन रांगोळ्या गुजरातवासीयांच्या आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरल्या. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला सुप्रसिद्ध लक्ष्मी निवास पॅलेस, वडोदरा येथे या विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. विलास रहाटे यांनी या दोन्ही रांगोळ्या ८ फूट x ८ फूट या आकारात यजमानांच्या इच्छेनुसार लाईव्ह स्वरूपात साकारून उपस्थित रसिकांची वाहवा मिळवली.

विवाहातील संगीत कार्यक्रमांमध्ये ‘गरबा नृत्य करणाऱ्या स्त्रिया’ यासंबंधीची आकर्षक पोट्रेट रांगोळी संगीत कार्यक्रम सुरू असताना साकारली होती. या संगीत कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध गरबा गीत गायिका फाल्गुनी फाटक यांची सादरीकरणासाठी प्रमुख उपस्थिती होती. तर विवाहाच्या दिवशी प्रतीकात्मक स्वरूपामध्ये ‘राधा-कृष्ण विवाहा’चा प्रसंग विधी सुरू असताना साकारला होता. सर्व धार्मिक विधींचे मंत्र पठण संगीतमय वातावरणात करण्यात आल्याने उत्तम अध्यात्माची अनुभूती येत होती. विलास रहाटे यांना या दोन्ही रांगोळ्यांसाठी मुंबई विद्यापीठाचे सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार विद्यार्थी मनोज चव्हाण यांचे  साह्य लाभले. यजमान रवेशिया कुटुंबीयांनी विलास रहाटे यांच्या इंस्टाग्राम व फेसबुक पेज वरील आकर्षक रांगोळ्या पाहून त्यांना या शाही विवाहामध्ये रांगोळी कला सादर करण्यासाठी आमंत्रित केले होते. विलास रहाटे यांनी साकारलेल्या रांगोळीचे अनेक मान्यवरांनी व कलाकारांनी प्रत्यक्ष भेटून कौतुक केले व भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Total Visitor Counter

3369517
Share This Article