गुहागर: तालुक्यातील खोडदे देऊळवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील माजी पोलीस पाटील आणि प्रगतशील शेतकरी रमाकांत विष्णू साळवी यांच्या चिरेबंदी वाड्याचा दरवाजा तोडून बिबट्याने आत प्रवेश करत अवघ्या सात दिवसांच्या वासराला ठार केले. ही घटना मध्यरात्री घडली असून, वाढत्या जंगलतोडीमुळे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
साळवी यांच्या वाड्यात इतरही गुरे होती, मात्र बिबट्याचा हल्ला होताच ही गुरे उधळली आणि त्यांनी एकत्र प्रतिकार केल्यामुळे बिबट्याला तिथून पळ काढावा लागला. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच जंगलात एका वासराचा बिबट्याने शिकार केल्याची घटना ताजी असताना, आता थेट घरात घुसून हल्ला केल्याने खोडदे परिसरात घबराट पसरली आहे.
बुधवारी पहाटेच्या सुमारास रमाकांत साळवी आणि त्यांचा मुलगा सर्वेश साळवी हे नेहमीप्रमाणे गाईंचे दूध काढण्यासाठी वाड्यात गेले असता, त्यांना वाड्याचा दरवाजा तुटलेल्या अवस्थेत दिसला. आत गेल्यावर बिबट्याने वासरू ठार मारल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच खोडदेच्या सरपंच पूजा गुरव, पोलीस पाटील योगिता पवार, वनपाल मांडवकर आणि प्रथमेश पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे आपला संताप व्यक्त केला. शाळकरी मुले आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, वन विभागाने या नरभक्षक बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तसेच जंगलतोडीवर कडक निर्बंध घालून वन्यप्राण्यांचा वावर वस्तीकडे रोखावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.





