GRAMIN SEARCH BANNER

पालशेत-जोईलवाडी तर्फे मुंबईत नमन प्रयोगाचे दमदार आयोजन

Gramin Varta
298 Views

गुहागर/ उदय दणदणे: रत्नागिरी जिल्ह्याला, विशेषतः गुहागर तालुक्याला देवखेळ्यांची आणि नमन लोककलेची मोठी परंपरा लाभली आहे. संकासुर, नटवा, कोलीन आणि पुरुषपात्रांच्या पारंपरिक वेशभूषेतील नृत्याविष्कार हे या कलेचे मुख्य आकर्षण असते. हीच वैभवशाली परंपरा जपणाऱ्या गुहागर तालुक्यातील पालशेत येथील श्री जोईलवाडी सार्वजनिक संस्था संलग्न श्री गजानन प्रासादिक नमन मंडळाने यंदा मुंबईच्या रंगमंचावर झेप घेतली आहे. वाडवडिलांकडून वारसाहक्काने मिळालेली ही लोककला गेली ५१ वर्षे अविरत जोपासणारे हे मंडळ कला, क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही नेहमीच अग्रेसर राहिले आहे. काळाप्रमाणे या कलेत नाविन्यपूर्ण बदल घडवून आणत या मोसमातील नमनाचा भव्य शुभारंभ प्रयोग शनिवार, दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी रात्री ७:३० वाजता दादर येथील प्रसिद्ध श्री छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.

या प्रयोगाचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात पुरुष पात्रांनी साकारलेला पारंपरिक गण, सुमधुर संगीत आणि रंगतदार गाण्यांचा समावेश असून साज-शृंगाराने सजलेल्या गवळणींचा नृत्याविष्कार रसिकांचे लक्ष वेधून घेणार आहे. याच सोहळ्यात संदीप कानसे लिखित आणि दिग्दर्शित ‘क्रांती’ हे वगनाट्य सादर केले जाणार आहे. विशेष म्हणजे, शिमगोत्सवातील देवखेळ्यांमधील पारंपरिक ‘नटवा’ हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असेल. हे मंडळ प्रथमच मुंबईच्या व्यावसायिक रंगमंचावर आपली कला सादर करत असून, नटवा आणि खेळे नमन यांचा हा अनोखा संगम रसिक प्रेक्षकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे. मंडळाच्या कलाकारांनी या प्रयोगासाठी अपार मेहनत घेतली असून, तमाम कलाप्रेमींनी या प्रयोगाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून दाद द्यावी, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष महेश नाचरे यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी अवधूत पाडावे, दुर्गेश बारगोडे किंवा महेश जोईल यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3199525
Share This Article