दापोली : तालुक्यातील मुरुड येथील बहुचर्चित साई रिसॉर्ट प्रकरणी शिवसेना नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांच्यासह सर्व आरोपींची खेड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली असून या निकालामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कायदेशीर संघर्षावर आता पडदा पडला आहे. या प्रकरणावरून राज्यभराचे राजकीय वातावरण तापले होते, मात्र पुराव्याअभावी न्यायालयाने सर्व आरोपींना दोषमुक्त ठरवल्याने अनिल परब यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तत्कालीन उपविभागीय प्रांताधिकारी, महसूल अधिकारी आणि मुरुडच्या सरपंचांवर भारतीय दंड विधानातील विविध कलमांनुसार तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. इमारत पूर्ण नसताना कर आकारणी करणे, स्टॅम्प शुल्क टाळणे, सीआरझेड क्षेत्रात बांधकाम करणे, बनावट स्वाक्षरी आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे वीज मीटर मिळवणे असे गंभीर आरोप सरकार पक्षाकडून करण्यात आले होते.
यावर सुनावणी दरम्यान बचाव पक्षाचे वकील अॅड. सुधीर बुटाला यांनी जमीन आणि बांधकाम हे दोन्ही स्वतंत्र घटक असल्याचा महत्त्वपूर्ण युक्तिवाद न्यायालयात मांडला, जो ग्राह्य धरत न्यायालयाने सर्व आरोपींची सुटका केली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणावरून अनिल परब यांच्यावर जोरदार राजकीय टीका केली होती.
मुरुड समुद्र किनाऱ्यावर रिसॉर्ट बांधताना २०० मीटरच्या मर्यादेत बांधकाम करून सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केल्याचा आणि समुद्र गिळंकृत केल्याचा ठपका सोमय्या यांनी ठेवला होता. या तक्रारीनंतर १४ नोव्हेंबर २०२२ रोजी दापोली पोलिस ठाण्यात अनिल परब आणि सदानंद कदम यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. यामध्ये केवळ पर्यावरणाचे नियमच नव्हे, तर मनी लाँड्रिंगचा संशय आणि शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून अवैध परवानगी मिळवल्याचे आरोपही करण्यात आले होते. मात्र न्यायालयाच्या या ताज्या निर्णयाने या सर्व आरोपांमधील कायदेशीर तथ्य फेटाळून लावत प्रकरणाचा निकाल दिला आहे.





