रायगड: जिल्ह्यातील महाड येथील ४२ वर्षीय मयूर चांदुरकर यांच्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी संकटकाळात खऱ्या अर्थाने देवदूत ठरला आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे निदान झाल्यानंतर उपचाराच्या अफाट खर्चामुळे हतबल झालेल्या चांदुरकर कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधी आणि टाटा ट्रस्टच्या माध्यमातून एकूण १२ लाख रुपयांची मदत मिळाल्याने मयूर यांच्यावर यशस्वी उपचार करणे शक्य झाले आहे.
मयूर चांदुरकर हे गेल्या ९ ते १० वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते, मात्र अचानक त्यांचे वजन घटू लागल्याने आणि अशक्तपणा वाढल्याने त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. तपासणीदरम्यान त्यांचे हिमोग्लोबिन सातत्याने कमी होत असल्याचे दिसून आले आणि पुढील चाचण्यांनंतर त्यांना रक्ताचा कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले. किरकोळ व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मयूर यांच्यावर वृद्ध आई-वडील, पत्नी आणि दोन मुलांची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत कर्करोगाच्या उपचारासाठी लागणारा १५ ते १८ लाख रुपयांचा खर्च पेलणे त्यांच्यासाठी अशक्य होते.
या कठीण प्रसंगी मयूर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळवून बॉम्बे हॉस्पिटलमार्फत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाकडे मदतीसाठी अर्ज केला. या अर्जाची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी तातडीने कार्यवाही केली. मुख्यमंत्री सहायता निधीतून २ लाख रुपये आणि कक्षाच्या समन्वयातून टाटा ट्रस्टकडून १० लाख रुपये अशी एकूण १२ लाख रुपयांची भरीव मदत चांदुरकर यांना उपलब्ध करून देण्यात आली.
या आर्थिक आधारामुळे मयूर चांदुरकर यांच्यावर वेळेत उपचार पूर्ण झाले असून १६ एप्रिल २०२६ रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांनी कर्करोगावर यशस्वी मात केली आहे. या मदतीबद्दल चांदुरकर कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहायता निधी कक्षाचे आभार मानले आहेत. राज्यातील कोणताही रुग्ण पैशाअभावी उपचारापासून वंचित राहू नये यासाठी हा कक्ष २४ तास कार्यरत असून, गरजू रुग्णांनी १८००१२३२२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.





