चिपळूण लाचलुचपत प्रकरण: व्यावसायिक अभिजित शिर्केची रवानगी न्यायालयीन कोठडीत

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

चिपळूण (प्रतिनिधी):लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेला पाग येथील व्यावसायिक अभिजित प्रकाश शिर्के (वय ४२) याला न्यायालयाने पोलीस कोठडी संपल्यानंतर आता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित सावर्डे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनीष कांबळे यांच्यावर मात्र अद्याप अटकेची कारवाई झालेली नाही. या लाचखोरीच्या प्रकरणाने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, सावर्डे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनीष कांबळे यांच्याकडे एका अपघात प्रकरणाचा तपास होता. या अपघातातील मृताच्या वारसदारांना विमा रक्कम मिळवण्यासाठी न्यायालयात दावा दाखल करायचा होता. त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे देण्यासाठी उपनिरीक्षक कांबळे यांनी २५ हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम व्यावसायिक अभिजित शिर्के याच्याकडे सुपूर्द करण्यास तक्रारदाराला फोनद्वारे सांगण्यात आले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात शिर्के हा २५ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडला गेला. याप्रकरणी कांबळे आणि शिर्के या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजित शिर्के याला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. बुधवारी कोठडीची मुदत संपताच त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक मनीष कांबळे यांनी अटकेची कारवाई टाळण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, ते अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *