मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील वनक्षेत्रात लागणाऱ्या आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि वणवे विझवण्यासाठी भविष्यात अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून दिली जाईल, अशी महत्त्वाची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत केली. राज्यातील विशेषतः बीड, सोलापूर आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये लागलेल्या आगींबाबत सदस्य ज्योती गायकवाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. सध्या सॅटॅलाइट प्रणालीच्या माध्यमातून वणवे ओळखण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि वनविभागाचे कर्मचारी यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सतत कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
वनमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यात २०४, सोलापूरमध्ये ३६ आणि बीड जिल्ह्यात २५ ठिकाणी वणवे लागल्याची नोंद झाली आहे. या आगी विझवण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापनाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांचाही सहभाग घेतला जात आहे. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्याचा उल्लेख करताना त्यांनी स्पष्ट केले की, या जिल्ह्यात सुमारे ९० टक्के जागा खासगी मालकीची आहे. खासगी जमिनीवरील झाडांना आग लागल्यामुळे फणस, आंबा, नारळ आणि पोफळी यांसारख्या बागायतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हा विषय कृषी विभागाच्या सहकार्याने प्राधान्याने मार्गी लावला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील एकवीरा वनक्षेत्रात लागलेली आग विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे समोर आले असून, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ती तात्काळ विझवण्यात आली. या पार्श्वभूमीवर, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महावितरणला (MSEB) जुन्या वीजवाहिन्या बदलण्याच्या सूचना दिल्या जातील. तसेच मंदिर परिसरात स्वच्छता राखून आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. या चर्चेत विधानसभा सदस्य संजय मेश्राम, शेखर निकम आणि बाबासाहेब देशमुख यांनी सहभाग घेऊन वनरक्षणाबाबत विविध सूचना मांडल्या.






