GRAMIN SEARCH BANNER

करबुडे–रत्नागिरी मार्गावर दुचाकी अपघात; महिला, दुचाकीस्वार व लहान मूल जखमी

Gramin Varta
271 Views

रत्नागिरी : करबुडे–रत्नागिरी मार्गावरील भावेआडोम परिसरातील धोकादायक वळणावर दुचाकीस्वाराचा ताबा सुटल्याने दुचाकी थेट रस्त्यालगतच्या खड्ड्यात कातळावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यासोबत प्रवास करणारी महिला आणि एक लहान मूलही जखमी झाले आहेत. ही घटना ११ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली असून अपघातात दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करबुडेतून रत्नागिरीच्या दिशेने एक दुचाकी निघाली होती. दुचाकीवर स्वारासोबत एक महिला व लहान मूल प्रवास करत होते. भावेआडोम परिसरातील अवघड वळणावर दुचाकीस्वाराला रस्त्याचा अचूक अंदाज न आल्याने त्याचा ताबा सुटला आणि दुचाकी रस्त्याबाहेर जाऊन कातळावर जोरात आदळली. धडकेनंतर दुचाकी सुमारे दहा फूट अंतरावर गटांगळ्या खात गेल्याने अपघाताची तीव्रता अधिक वाढली.या भीषण धडकेत दुचाकीची सीट तुटून पडली असून गाडीच्या दर्शनी भागासह अन्य भागांचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघातानंतर घटनास्थळी महिलेचा दुपट्टा, चप्पल तसेच लहान मुलाच्या आणि दुचाकीस्वाराच्या चप्पला विखुरलेल्या अवस्थेत आढळून आल्या.अपघाताची भीषणता पाहता तिघेही गंभीर जखमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीस धाव घेत जखमींना उपचारासाठी हलविण्याची व्यवस्था केल्याचे समजते. दरम्यान, या धोकादायक वळणावर वारंवार अपघात घडत असल्याने येथे सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Total Visitor Counter

3199393
Share This Article