रस्त्यांच्या डागडुजीसह दोन हेलिपॅड उभारली
मंडणगड – येत्या १६ ऑगस्ट रोजी मंडणगड येथे दिवाणी कनिष्ठ न्यायालयाचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, सर्वच आघाड्यांवर कामाला वेग आला आहे. उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरन्यायाधीश भूषण गवई उपस्थित राहणार असल्याने संपूर्ण यंत्रणा ‘हाय अलर्ट’वर काम करत आहे.
या कार्यक्रमासाठी रस्ते दुरुस्ती, रंगरंगोटी आणि सुशोभीकरणासह दोन हेलिपॅड उभारण्यात आले आहेत. शासकीय यंत्रणेकडून अद्याप अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी, जिल्हास्तरावरील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी मंडणगडमध्ये तळ ठोकून आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक स्वतः तालुक्याला वारंवार भेट देऊन कामाचा आढावा घेत आहेत.
कार्यक्रमासाठी येणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींसाठी शिरगाव येथे हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. तसेच, हेलिपॅडपासून कार्यक्रमस्थळापर्यंतच्या मुख्य रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम सुरू झाले आहे. न्यायालयाच्या इमारतीकडे जाणाऱ्या जोड रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. इमारतीची रंगरंगोटी आणि सुशोभीकरण जवळपास पूर्ण झाले आहे. इमारतीच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी फाउंडेशन तयार करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली असून, सुरक्षा परवान्यांचे कामही वेगात सुरू आहे. जाहीर कार्यक्रमासाठी मंडप उभारणीच्या कामालाही सुरुवात झाली आहे.