ठाकरे गटाने केलेले आरोप खोटे अन् बिनबुडाचे; महायुतीची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती
रत्नागिरी: महायुतीच्या वतीने रत्नागिरी शहराच्या विकासाला गती देण्याचा निर्धार शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला. महायुती सरकारने शहरासाठी भरघोस निधी आणला असून, अनेक विकासकामे सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देत, खड्डे भरण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आल्याचे महायुतीकडून स्पष्ट करण्यात आले.
शिवसेनेचे शहराध्यक्ष बिपीन बंदरकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, पावसाळ्यामुळे रस्त्यांवरील काँक्रेटीकरणाचे काम थांबले होते, ज्यामुळे रस्त्यांची स्थिती बिघडली. मात्र, आता पावसाने विश्रांती घेतल्याने शहरात खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. तसेच, महायुतीच्या कामांवर उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून वारंवार खोटे आरोप केले जात असल्याचा दावा बंदरकर यांनी केला. शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल, असेही ते म्हणाले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी यावेळी माहिती दिली की, काँक्रिट पॅचेससाठी पाठपुरावा सुरू आहे. विशेष म्हणजे, नाशिकमधून नवीन तंत्रज्ञान वापरून शहरात खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. “जनतेला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण महायुतीचे काम पूर्णपणे विकासाभिमुख आहे,” असे सावंत यांनी स्पष्ट केले.
शहराच्या विकासाची गती कायम राखण्याचा महायुतीचा निर्धार आहे. या पत्रकार परिषदेला रत्नागिरी शहरातील शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपामधील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.