देवरूख: संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकणाऱ्या कु. प्रसाद नंदकुमार जाधव याने गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत घवघवीत यश संपादन करत राज्याच्या गुणवत्ता यादीत आठवे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे, रत्नागिरी जिल्ह्यात त्याने प्रथम क्रमांक मिळवत आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली आहे. प्रसादच्या या अतुलनीय यशामुळे त्याची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे, ही देवरूखवासीय आणि न्यू इंग्लिश स्कूलसाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे.
प्रसादच्या या दैदिप्यमान यशामागे त्याची अभ्यासातील प्रचंड एकाग्रता, पालकांचे योग्य मार्गदर्शन आणि शाळेतील शिक्षकांचे अथक परिश्रम यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. कठोर मेहनतीच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले असून, त्याच्या या निवडीमुळे तालुक्यात आनंदाचे आणि कौतुकाचे वातावरण आहे.
न्यू इंग्लिश स्कूल, देवरूख प्रशालेच्या वतीने प्रसाद आणि त्याच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस आणि भविष्यातील उज्ज्वल कारकिर्दीस यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.