डोंबिवली – बारावीच्या परीक्षेला जाताना लोकलमधून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

डोंबिवली: बारावीची परीक्षा देण्यासाठी जात असताना लोकल रेल्वेतून पडून १८ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास मुंब्रा ते कळवा रेल्वे स्थानकादरम्यान घडली.

या अपघातामुळे डोंबिवली शहरातील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोहम सचिन कटरे असे अपघातात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सोहम हा डोंबिवलीत आपल्या मामाकडे राहत होता. बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठी कळवा येथील मनीषा विद्यालयात असलेल्या परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी तो सकाळी घरातून निघाला होता.

नेहमीप्रमाणे सकाळच्या वेळेत अत्यंत गर्दीने भरलेल्या लोकल रेल्वेतून सोहमने प्रवास करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंब्रा-कळवा दरम्यान प्रवाशांच्या प्रचंड रेट्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो धावत्या रेल्वेगाडीतून खाली कोसळला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.

सोहम डोंबिवली रेल्वे स्थानकातून लोकलमध्ये चढला होता. रेल्वेगाडी मुंब्रा ते कळवा स्थानकादरम्यान असताना ही दुर्घटना घडली. घटनेची नोंद ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, सकाळच्या वेळेत लोकल रेल्वेतील प्रचंड गर्दीमुळे वारंवार अपघात घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर, परीक्षा कालावधीत परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी विशेष लोकल गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून जोर धरू लागली आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *