GRAMIN SEARCH BANNER

दापोलीत हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
57 Views

दापोली : तालुक्यातील जोगळे येथील एका विवाहितेचा हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करून तिची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नजीफा मंजूर दळवी या २७ वर्षीय विवाहितेने यासंदर्भात पोलिसांत फिर्याद दिली असून, यामध्ये पतीसह सासरच्या पाच मंडळींचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नजीफा यांचा विवाह ९ नोव्हेंबर २०२४ रोजी झाला होता. लग्नानंतर ९ नोव्हेंबर २०२४ ते ८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत नजीफा या जोगळे येथील भारत नगरमधील नशेमन कॉलनी येथे सासरी राहत असताना, आरोपींनी संगनमत करून हुंड्यासाठी त्यांचा छळ सुरू केला. आरोपी पती मंजूर शकील दळवी, मुमताज शकील दळवी, शकील दिलावर दळवी, मेहनाज वाहिद महाडीक आणि कमरजहॉन शादाब मुजावर यांनी फिर्यादीला वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देऊन क्रूर वागणूक दिली.

इतकेच नव्हे तर, फिर्यादीने या त्रासाबाबत कोणाला काही सांगितल्यास किंवा पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास तिला जीवे ठार मारण्याची धमकीही आरोपींकडून देण्यात आली होती. या त्रासाला कंटाळून सध्या नजीफा चिपळूण येथील गोवळकोट रोडवरील सलमान कॉलनी येथे आपल्या माहेरी राहत आहेत. सासरच्या मंडळींनी फिर्यादीच्या लग्नात मिळालेले १ लाख ३० हजार रुपये रोख आणि १० तोळे सोन्याचे दागिने स्वतःच्या ताब्यात ठेवून त्याचा अपहार केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ८५, ३१६(२), ३१८(४), ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3233333
Share This Article