संगमेश्वर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर येथील पैसाफंड हायस्कूलसमोर एका दुचाकीस्वाराने मालवाहू ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात स्वतःचा उजवा पाय गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी पिंपळी बुद्रुक येथील विलास महादेव चव्हाण (वय ३५) या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपासात त्याच्याकडे वाहन चालवण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले आहे.
मिळालेली माहिती अशी की, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.४५ च्या सुमारास विलास चव्हाण हा आपल्या मेव्हणीच्या ताब्यातील स्प्लेंडर मोटारसायकलवरून (क्र. एमएच ०८ बीडी ६५६८) चिपळूणहून मार्लेश्वरच्या दिशेने जात होता. संगमेश्वर गावाजवळ महामार्गाच्या उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने तेथे वळण रस्ता (डायव्हर्जन) तयार करण्यात आला आहे. हा रस्ता अरुंद, खड्डेमय आणि काही प्रमाणात मातीचा असल्याने तेथे धूळ उडू नये म्हणून पाणी मारण्यात आले होते. रस्त्याची ही निसरडी आणि कठीण परिस्थिती लक्षात न घेता, आरोपीने समोरून जाणाऱ्या मालवाहू ट्रकला (क्र. एमएच ४५ एएफ ७९१५) ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षित अंतर न राखल्याने ट्रकचा कोपरा त्याच्या हाताला लागला आणि गाडीवरील नियंत्रण सुटले. परिणामी, दुचाकी घसरून विलास थेट ट्रकच्या मागील चाकाखाली आला, ज्यात त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.या अपघातानंतर संगमेश्वर पोलीस ठाण्याचे हवालदार विनय वसंत मनवल यांनी सरकारी कामाचा भाग म्हणून फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी २६ मार्च रोजी या प्रकरणाची दखल घेत विलास चव्हाण विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ व ३/१८१ अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर २१/२०२६ नुसार नोंद केला आहे. विनापरवाना आणि बेदरकारपणे वाहन चालवून स्वतःच्याच गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली असून, संगमेश्वर पोलीस अधिक तपास करत आहेत.
संगमेश्वर : ट्रकला ओव्हरटेक करताना दुचाकीला अपघात, उजवा पाय निकामी, तरुणावर गुन्हा दाखल







