GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वरमध्ये ठेकेदाराचा जीवघेणा हलगर्जीपणा; महामार्गावरील ‘डेथ ट्रॅप’मुळे अवजड वाहन हवेत लटकले

संगमेश्वर (एजाज पटेल): मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामात आता ठेकेदाराच्या मुजोर आणि बेजबाबदार कारभाराची भर पडली असून, सोमवारी रात्री संगमेश्वरमधील पारेख पेट्रोल पंपाजवळ एका भीषण अपघाताने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. महामार्गाच्या पूर्ण झालेल्या मुख्य रस्त्याची उंची आणि बाजूचा कच्चा रस्ता यामध्ये ठेकेदाराने ठेवलेल्या तब्बल दीड ते दोन फुटांच्या फरकामुळे एक अवजड वाहन हवेत लटकले. या घटनेमुळे महामार्गावर दोन्ही बाजूंना ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, परिणामी हजारो प्रवाशांना मध्यरात्री भीषण वाहतूक कोंडीचा आणि मनस्तापाचा सामना करावा लागला.

महामार्गाच्या एका बाजूचे काम पूर्ण झाल्याने तेथून दुहेरी वाहतूक सुरू आहे, मात्र रस्त्याच्या कडांना सुरक्षा कठडे (बॅरेकेटर्स) किंवा रिफ्लेक्टर नसल्याने हा मृत्यूचा सापळा ठरत आहे. अपघातातील चालकाने दिलेल्या माहितीनुसार, समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर प्रकाशझोतामुळे रस्त्याचा अंदाज आला नाही आणि बाजू देताना गाडी थेट दीड फूट खाली कोसळली. सुदैवाने हे वाहन पलटी झाले नाही, अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती. या भीषण कोंडीत अडकलेली लहान मुले, महिला आणि वृद्ध प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

विशेष म्हणजे, अपघात होऊनही संबंधित ठेकेदार कंपनीचा एकही प्रतिनिधी मदतीला फिरकला नाही. अखेर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने दोन-अडीच तासांच्या अथक परिश्रमानंतर वाहन बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. आरवली ते कांटे दरम्यान वारंवार होणाऱ्या अपघातांनंतरही ठेकेदार कंपनीकडून सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याने, आता प्रशासनाने अशा बेजबाबदार कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, अशी संतप्त मागणी जनतेतून केली जात आहे.

Total Visitor Counter

3473538
Share This Article