GRAMIN SEARCH BANNER

राजापूर : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची तावडे अतिथी भवनाला भेट

Gramin Varta
136 Views

राजापूर: मुंबईच्या महापौरपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रथमच सौ. रितू तावडे यांनी आपल्या मूळ गावी आडिवरे येथे भेट दिली. या वेळी तावडे वाड्यात झालेल्या पारंपरिक आणि भावनिक स्वागतामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. महापौर म्हणून गावच्या लेकीचे स्वागत करण्यासाठी कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक औक्षण, आपुलकीने केलेली विचारपूस आणि मिळालेला आशीर्वाद यामुळे सौ. रितू तावडे भावुक झाल्या.

या भेटीदरम्यान त्यांच्या समवेत पती राजेश तावडे आणि मुलगा यश तावडे उपस्थित होते. दिवसभर शहरातील प्रशासकीय कामकाज, बैठका आणि विकासकामांच्या धावपळीतून मिळालेला हा कौटुंबिक क्षण मनाला उभारी देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.

आडिवरे येथील तावडे अतिथी भवनास त्यांनी सहकुटुंब भेट दिली. येथे त्यांनी कुलदैवत श्री सप्तकोटीश्वर आणि श्री महाकालीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. “येथून मिळणारा आशीर्वाद जनसेवेसाठी अधिक बळ देणारा आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

तावडे अतिथी भवनात वास्तव्यास असताना त्यांनी परिसरातील श्री सप्तकोटीश्वर मंदिराच्या उभारणीबाबतची माहिती आर्किटेक्ट संतोष तावडे यांच्याकडून जाणून घेतली. या वेळी त्यांनी मूर्तीसमोर नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त केली.

या भेटीबाबत आर्किटेक्ट संतोष तावडे यांनीही भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करत, ही संपूर्ण तावडे कुटुंबासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी घटना असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, उच्च पदावर असूनही आपल्या मुळांशी, कुलदैवतांशी आणि समाजाशी असलेली नाळ जपणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे.

या भेटीमुळे आडिवरे परिसरात आनंदाचे आणि भावनिक वातावरण पाहायला मिळाले.

Total Visitor Counter

3380659
Share This Article