GRAMIN SEARCH BANNER

जयगड प्रीमियर लीग २०२६ साठी 140 खेळाडूंमधून 112 खेळाडूंची निवड पूर्ण; मार्चअखेर रंगणार क्रिकेटचा थरार

Gramin Varta
319 Views

जयगड: रत्नागिरी जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींचे विशेष आकर्षण असलेल्या ‘जयगड प्रीमियर लीग २०२६’ (JPL7) ची खेळाडू निवड प्रक्रिया नुकतीच जयगड येथे अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या निवड प्रक्रियेत तालुक्यातील सुमारे १४० खेळाडूंनी सहभाग नोंदवून या स्पर्धेची वाढती लोकप्रियता सिद्ध केली. लीगचे अध्यक्ष रिजवान रियाज वाडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या प्रक्रियेत एकूण ८ संघांसाठी प्रत्येकी १४ खेळाडू याप्रमाणे ११२ खेळाडूंची अंतिम निवड करण्यात आली आहे. ही बहुप्रतिक्षित स्पर्धा मार्च महिन्याच्या अखेरीस खेळवली जाणार असल्याची अधिकृत माहिती यावेळी आयोजकांनी दिली.

या संपूर्ण निवड प्रक्रियेत कमालीची पारदर्शकता राखण्यात आली होती. रत्नागिरीचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध समालोचक सरदार भाई शेख यांच्या जोशपूर्ण समालोचनाने या कार्यक्रमात मोठी रंगत भरली. कार्यक्रमाची सुरुवात लीगचे सेक्रेटरी तोसिफ अब्दुल रहीम पांजरी यांच्या प्रास्ताविक समालोचनाने झाली. आपल्या मनोगतात त्यांनी व्यक्त केले की, जयगड प्रीमियर लीग ही केवळ एक क्रीडा स्पर्धा नसून ती जयगडकरांच्या एकतेचा आणि आपुलकीचा उत्सव आहे. या स्पर्धेत हार-जीत गौण असून गावातील सर्व वाड्यांमधील खेळाडूंची एकात्मता आणि गावाचा गौरव महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. या निवड प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून करण्यात आल्याने जगभरातील क्रीडाप्रेमींना हा सोहळा अनुभवता आला. या प्रसंगी लीगचे सर्व कमिटी सदस्य, आयोजक मंडळ आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यशस्वी निवड प्रक्रियेमुळे आता जयगडमध्ये क्रिकेटचा ज्वर वाढू लागला आहे.

Total Visitor Counter

3358648
Share This Article