राष्ट्रीय स्तरावरील ‘चिन्मय गीता फेस्ट २०२५’ स्पर्धेसाठी निवड
मकरंद सुर्वे / संगमेश्वर : तालुक्यातील निढळेवाडी या छोट्याशा गावातील सहा वर्षांची बालप्रतिभा श्रीशा अनुप पिंपरकर हिने आपल्या गीता पठण कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पुणे येथे नुकतीच संपन्न झालेल्या चिन्मय मिशन मुंबई आयोजित ‘श्रीमद्भगवद्गीता अध्याय १५ – पुरुषोत्तम योग’ या राज्यस्तरीय स्पर्धेत श्रीशाने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे श्रीशाची ‘नॅशनल चिन्मय गीता चॅन्टिंग कॉम्पिटिशन २०२५’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली असून ही स्पर्धा येत्या २९ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे.
लहान वयातच गीतेचे पठण, अर्थ आणि भावार्थ आत्मसात करणाऱ्या श्रीशाच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पालक, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांनी तिच्या पुढील प्रवासासाठी अभिनंदनासह उत्तम शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
संगमेश्वर निढळेवाडीतील श्रीशा पिंपरकर राज्यस्तरीय भगवद्गीता पठण स्पर्धेत द्वितीय






