GRAMIN SEARCH BANNER

वाहतुकीला अडथळा प्रकरणी देवरुख, दापोली, मंडणगडमध्ये चार चालकांवर गुन्हे

Gramin Varta
27 Views

रत्नागिरी : सार्वजनिक रस्त्यावर बेजबाबदारपणे वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या चालकांविरुद्ध रत्नागिरी पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली असून, गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील स्टेट बँक रोडवर दळी लॉजसमोर आपली बोलेरो पिकअप (एमएच ०८ एपी ९१८३) रस्त्याच्या मध्यभागी उभी करून रहदारीस धोका निर्माण केल्याप्रकरणी चालक इसाक इब्राहीम शेख (रा. देवरुख) याच्यावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल सचिन लगारे यांनी ही कारवाई केली.

अशाच प्रकारची दुसरी कारवाई दापोली ते हर्णे रोडवरील बुरोडी नाका येथे करण्यात आली. या ठिकाणी चालक प्रकाश रामचंद्र गोरीवले (रा. म्हाळुंग करंजनी) याने आपली महिंद्रा सुप्रो चारचाकी (एमएच ०८ एपी ५१६८) पादचाऱ्यांना व इतर वाहनांना धोका होईल अशा स्थितीत सोडून दिल्याने दापोली पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई केली आहे.

जिल्ह्यातील तिसरी घटना मंडणगड तालुक्यातील वेसवी नाका येथे घडली असून, या ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर आपली काळ्या रंगाची बोलेरो (एमएच ०६ ए ५३५७२) धोकादायक स्थितीत उभी केल्याप्रकरणी रिझवान दाऊद ओबिलकर (रा. किंजळघर) याच्यावर बाणकोट सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच मिऱ्या-नागपूर महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे बाजारपेठेत वळणावर डंपर (एमएच ५१ सी २०००) उभा करून वाहतुकीस अडथळा आणल्याप्रकरणी चालक मुकेश दुलारचंद गंडलू (सध्या रा. लांजा, मूळ झारखंड) याच्यावर साखरपा पोलीस दुरक्षेत्राच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २८५ नुसार गुन्हे दाखल केले असून, रस्त्यावर विनाकारण आणि धोकादायक पद्धतीने वाहने उभी करणाऱ्यांना हा कडक इशारा मानला जात आहे.

Total Visitor Counter

3346039
Share This Article