GRAMIN SEARCH BANNER

महाराष्ट्र राज्याला, राज्याच्या परंपरेला आणि संस्कृतीला साजेसा विकास रत्नागिरीमध्ये -पालकमंत्री डॉ.उदय सामंत

Gramin Varta
6 Views

महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्‍थापना दिन ; पालकमंत्र्यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना

रत्नागिरी: महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरी येथील पोलीस परेड ग्राऊंडवर आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात राज्याचे उद्योग तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्र्यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा नवा संकल्प जाहीर केला. रत्नागिरीचे विमानतळ आता उड्डाणासाठी सज्ज असून, रेल्वे स्थानक आणि विविध प्रशासकीय इमारतींच्या माध्यमातून जिल्ह्याचे स्वरूप पूर्णतः बदलत असल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले. महाराष्ट्र राज्याच्या वैभवशाली परंपरेला आणि संस्कृतीला साजेसा विकास रत्नागिरीमध्ये होत असून या प्रगतीच्या प्रवासात जनतेने साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती देताना डॉ. सामंत म्हणाले की, रत्नागिरीत १०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेली प्रशासकीय इमारत पूर्णत्वाकडे असून, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. तसेच १६९ कोटी रुपये खर्चाच्या पोलीस मुख्यालयाच्या इमारतीचे काम वेगाने सुरू आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्राचे लोकार्पण करण्यात येणार असून, आरेवारे किनाऱ्याजवळ ५ कोटी रुपये खर्चून उभारले जाणारे ‘इको ट्युरिझम’ केंद्र डिसेंबरपर्यंत पर्यटकांच्या सेवेत दाखल होईल. केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजूर झालेल्या केंद्रीय विद्यालयासाठी नाचणे येथे अडीच हेक्टर जागा नाममात्र दराने उपलब्ध करून दिल्याने जिल्ह्याच्या शैक्षणिक वैभवात मोठी भर पडली असल्याचेही त्यांनी सांगितले.

रत्नागिरी प्रशासनाने राबविलेल्या नाविन्यपूर्ण योजनांची दखल आता संपूर्ण राज्य घेत असल्याचे सांगत पालकमंत्र्यांनी ‘नासा आणि इस्रो’ अभ्यास दौऱ्याचा गौरव केला. शेतकऱ्यांसाठी नमो किसान योजना आणि फळपीक विम्यातून मिळालेली मदत, तसेच जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत उभारण्यात येत असलेली ‘संविधान भवने’ हे महाराष्ट्रातील पहिलेच पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संविधान भवनांच्या माध्यमातून यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेचे मोफत प्रशिक्षण तरुणांना दिले जाणार आहे. या सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला, तसेच पोलीस दलासाठी नवीन वाहनांचे लोकार्पणही पार पडले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी मनुज जिंदल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Total Visitor Counter

3345662
Share This Article