करेल येथे सिमेंट काँक्रीट तर मीठगवाणे येथे डांबरीकरण रस्त्याचे उद्घाटन, ग्रामस्थांनी व्यक्त केली समाधानाची भावना
राजन लाड / जैतापूर : जैतापूर न्यूक्लियर पॉवर प्रकल्प अंतर्गत, न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) यांच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत करेल आणि मीठगवाणे गावात रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली असून, त्यांचे उद्घाटन दिनांक ७ जून २०२५ रोजी करण्यात आले.
करेल गावात ११०० मीटर सिमेंट काँक्रीट रस्ता
करेल गावात ११०० मीटर लांबीचा सिमेंट काँक्रीट रस्ता बांधण्यात आला असून, यामुळे स्थानिक नागरिकांना टिकाऊ व सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. या रस्त्याचे उद्घाटन NPCIL चे अपर मुख्य अभियंता श्री. आशुतोष शिवपूरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी निवेली ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच ,सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करेल येथील काही स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी यासाठी मागणी आणि पाठपुरावा केला होता.
मीठगवाणे गावात ६०० मीटर डांबरीकरण रस्ता – छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अंजनेश्वर मंदिर
याच दिवशी मीठगवाणे गावात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अंजनेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या ६०० मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले असून, त्याचेही उद्घाटन करण्यात आले. या सोयीस्कर रस्त्यामुळे नागरिकांना देवस्थानाकडे जाणे अधिक सुलभ झाले आहे. या कार्यक्रमास मीठगवाणे ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
पूर्वीही NPCILकडून अनेक रस्ते प्रकल्प पूर्ण
NPCILच्या माध्यमातून यापूर्वीही निवेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील बाकाळे , काजूरमळी, तसेच अणसुरे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दांडेवाडी, दांडी तेलीवाडी आणि अणसुरे खालची वाकी या भागांत सुद्धा सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे यशस्वीरित्या पार पडली आहेत. तर जैतापूर हायस्कूलला कंपाउंड वॉल आणि स्वच्छतागृहांची कामे देखील पूर्ण झालेली आहेत.
NPCILचा सामाजिक विकासात सक्रिय सहभाग
NPCIL ‘हरित ऊर्जा – स्वच्छ ऊर्जा – सुरक्षित ऊर्जा’ या तत्त्वांचा अंगीकार करत सातत्याने स्थानिक विकासासाठी प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करून स्थानिक जीवनमान उंचावण्यात या उपक्रमांचा मोठा वाटा असणार आहे. असे अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले. ग्रामस्थांनीही उपस्थित अधिकारी वर्गाचे स्वागत करीत आभार मानले.