रत्नागिरी: परमिट बंद करण्यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालक येत्या गुरुवार, दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता रत्नागिरी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) आणि जिल्हाधिकारी कार्यालय या दोन महत्त्वाच्या ठिकाणी धडक देणार आहेत. अनेकदा निवेदने देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर रिक्षा चालकांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
या आंदोलनादरम्यान रिक्षा चालक आरटीओ आणि जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करणार आहेत. जर या निवेदनांचा गांभीर्याने विचार करून मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालक आपापल्या तालुक्यांमध्ये बंद पुकारून आरटीओ कार्यालयांना घेराव घालतील, असा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील रिक्षा चालकांच्या विविध समस्यांवर प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळेच न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार रिक्षा चालकांनी केला आहे.
या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चिपळूण तालुका अध्यक्ष दिलीप खेतले, रत्नागिरी तालुकाध्यक्ष प्रताप भाटकर, राजापूर अध्यक्ष संतोष सातशे, लांजा अध्यक्ष लहू कांबळे, रत्नागिरी अध्यक्ष अविनाश कदम, खेड तालुका अध्यक्ष भालेकर आणि सेक्रेटरी संजय जोशी यांनी केले आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता रत्नागिरी आरटीओ कार्यालयाजवळ उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.