राजापूर प्रतिनिधी : घटस्फोटित सज्जाद अब्दुलरेहमान मस्तान (वय ५०, रा. डोंगर-मुसलमानवाडी) यांच्या पुनर्विवाहाची इच्छा त्यांच्या आयुष्यात नवी सुरुवात घेऊन येणार होती. पण हीच इच्छा अखेरीस मोठ्या फसवणुकीत बदलली.
सन २०२२ मध्ये योग्य वधूच्या शोधात असताना सज्जाद यांची ओळख त्यांच्याच गावातील मुबीन फकीर कालू याच्याशी झाली. मुबीनने “सबा शेख” नावाची मुलगी आहे, तिच्याशी तुमचं लग्न जमवून देतो, असं सांगून विश्वास संपादन केला. मोबाईल क्रमांक देत “लग्नाची बोलणी करण्यासाठी ५० हजार रुपये लागतील” असं सांगितलं. पहिल्या टप्प्यात सज्जाद यांनी १६ हजार रुपये दिले.
यानंतर “मुलीचे वडील आजारी आहेत” या कारणावरून ३४ हजार रुपये उकळले. सबा शेख असल्याचा भास निर्माण करून मुबीन व्हॉट्सअॅपवरून सज्जाद यांच्याशी चॅट करत राहिला. “नवीन ड्रेस, लग्नाची तयारी” अशा सबबी सांगत नोव्हेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या काळात गुगल पेच्या माध्यमातून आणखी १ लाख ३३ हजार रुपये घेतले.
लग्नाची बोलणीबाबत सज्जाद यांनी वारंवार विचारणा केली तरी मुबीन उडवाउडवीची उत्तरे देत राहिला. संशय आल्यावर सज्जाद यांनी पोलिसात तक्रार करणार असल्याचा इशारा दिला आणि मुबीनला घेऊन थेट बारामतीला गेले. पण तिथे “सबा शेख” नावाची कोणतीही मुलगी भेटली नाही. मुबीनने पैसे परत देण्याचे आश्वासन दिले; मात्र तीन वर्षे टाळाटाळ केली.
यामुळे अखेर सज्जाद यांनी राजापूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी मुबीन फकीर कालू याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ४१९ व ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.
विश्वासाचा गैरफायदा घेऊन लग्नाच्या गोड बोलण्यातून लाखो रुपये उकळणाऱ्या या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.
राजापूर : लग्न जमवून देतो सांगत तब्बल १ लाख ८३ हजारांचा गंडा!
