राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे आवाहन; अन्यथा पोलीस बंदोबस्तात हटवणार
लांजा : नगरपंचायत कार्यक्षेत्रातील मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा शहरातील अतिक्रमणे ३ जुलै पर्यंत हटवावीत अन्यथा पोलीस बंदोबस्तात ती हटवण्यात येतील. तसेच संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात होऊन अनेक वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील आणि विशेषत: लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गाचे काम हे रखडलेल्या स्थितीत आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्ग राष्ट्रीय प्राधिकरण विभागाच्यावतीने सूचनावजा आवाहन जाहीर केले आहे. यामध्ये लांजा शहरातील नगरपंचायत हद्दीतील अतिक्रमणे यामध्ये टपऱ्या, दुकाने व अन्य अतिक्रमणे ही ३ जुलै पर्यंत काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महामार्गाची हद्द ही गटाराच्या बाहेर पाच ते सहा फूट असून पुलाखालील सर्व प्रकारची अतिक्रमणे देखील काढण्यात येणार आहेत.
सर्व संबंधित टपरी, दुकान चालक यांनी ३ जुलै पूर्वी आपली सर्व प्रकारची अतिक्रमणे हटवावीत अन्यथा ३ जुलै नंतर प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात ही सर्व प्रकारची अतिक्रमणे हटवण्यात येतील. त्यानंतर अतिक्रमण करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील. याची सर्व अतिक्रमण करणाऱ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन महामार्ग प्राधिकरण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.