देवरूख : येथील सोने व्यापाऱ्याला रस्त्यात अडवून अपहरण, खंडणी आणि दरोडा प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून नाव असलेल्या सागर प्रकाश कदम याला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने नियमित जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाने २०२५ मध्ये संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मोठी खळबळ उडवली होती. त्यानंतर झालेल्या या प्रकरणात रत्नागिरी पोलिसांनी कर्नाटकातून सागर कदम याच्यासह अनेक आरोपींना अटक केली होती. या प्रकरणात सागर हा मुख्य सूत्रधार होता. सागर कदम याला जामीन मिळाला असल्याने सध्या खुलेआम फिरत आहे. गेली 8 महिने तो पोलिस कोठडीत होता.
न्यायमूर्ती मेहरोज के. पठाण यांनी १ जुलै २०२६ रोजी हा आदेश दिला. अर्जदाराच्या वतीने ॲड. राकेश भाटकर, ॲड. विवेक दुबे आणि ॲड. आर्य आंबुलकर यांनी बाजू मांडली.
देवरूख पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक १०४/२०२५ नुसार, सप्टेंबर २०२५ मध्ये देवरूख–साखरपा मार्गावर एका सराफ व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्याकडील रोख रक्कम व दागिने लुटण्यात आले होते. तसेच मोठ्या रकमेच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोपही होता. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सरकार पक्षाच्या मते, सागर कदम हा या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असून, मुख्य आरोपींनी वापरलेले रिव्हॉल्व्हर नदीत फेकून पुरावा नष्ट करण्यास त्याने मदत केल्याचा आरोप आहे. मात्र बचाव पक्षाने न्यायालयात युक्तिवाद करताना सागर कदम याचा अपहरण, दरोडा किंवा खंडणीच्या कटात प्रत्यक्ष सहभाग नसून केवळ सहआरोपींच्या जबाबांच्या आधारे त्याला गोवण्यात आल्याचा दावा केला.
उच्च न्यायालयाने उपलब्ध प्रथमदर्शनी पुराव्यांचा विचार करताना निरीक्षण नोंदविले की, सागर कदम याची भूमिका मुख्य गुन्हा घडल्यानंतर कथित शस्त्र लपविण्यापुरती मर्यादित असल्याचे दिसते. अपहरण, दरोडा, खंडणीची मागणी किंवा गुन्हेगारी कटात त्याचा प्रत्यक्ष सहभाग प्रथमदर्शनी दिसून येत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.
त्यानंतर न्यायालयाने १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि दोन सक्षम जामीनदारांच्या हमीवर सागर कदम याची सुटका करण्याचे आदेश दिले. तसेच तपास अधिकाऱ्यासमोर नियमित हजेरी लावणे, साक्षीदारांवर कोणताही दबाव न आणणे आणि तपासात सहकार्य करणे अशा अटीही घालण्यात आल्या आहेत.
देवरूख येथील सोने व्यापारी लुटमार प्रकरण : संशयित मुख्य सूत्रधार सागर कदमला उच्च न्यायालयाचा जामीन
Leave a Comment
