GRAMIN SEARCH BANNER

पालेभाज्यांचे दर दुप्पट, पावसामुळे आवक घटली

पुणे : पुणे विभागासह राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. आवक निम्म्याने कमी झाली असल्याने दर दुप्पट झाले आहेत. पुण्यासह सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर भागात पाऊस सुरू आहे.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील तरकारी विभागात दररोज पालेभाज्यांची आवक होते. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पालेभाज्यांची काढणी झाली नाही, तसेच पावसामुळे पालेभाज्या भिजल्याने नुकसान झाले आहे. मागणीच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने दर दुप्पट झाले आहेत, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील पालेभाजी व्यापारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.

सोमवारी (१८ ऑगस्ट) तरकारी विभागात दीड लाख जुडी कोथिंबिरेची आवक झाली होती. मंगळवारी (१९ ऑगस्ट) कोथिंबिरेच्या ७५ हजार जुडींची आवक झाली. सोमवारी मेथीच्या ४० हजार जुडींची आवक झाली, त्यानंतर मंगळवारी मेथीच्या दहा हजार जुडींची आवक झाली. कांदापात, पुदिना, मुळे, शेपू या पालेभाज्यांची आवक कमी झाली.

पालेभाज्यांचे किरकोळ बाजारातील जुडीचे दर

कोथिंबिर- २५ ते ३० रुपये

मेथी – २५ ते ३० रुपये

शेपू- २० ते २५ रुपये

कांदापात – २० ते २५ रुपये

पालक – १५ ते २० रुपये

पुदीना – १० ते १५ रुपये

मुळे – २५ ते ३० रुपये

लिंबांच्या दरात वाढ

पावसामुळे लिंबांची तोड झाली नाही. त्यामुळे बाजारात लिंबांची आवक मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणावर होत आहे. लिंबांच्या १८ ते २० किलो गाेणीच्या दरात १०० रुपयांनी वाढ झाली. सोलापूर, तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातून लिंबांची आवक होत आहे.

पावसामुळे पालेभाज्या खराब झाल्या आहेत. गेल्या दोन दिवसांत पालेभाज्यांची आवक निम्म्याने कमी झाली आहे. पालेभाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आठवडभरात पालेभाज्यांची आवक वाढेल. – राजेंद्र सूर्यवंशी, पालेभाजी व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड, तरकारी विभाग

Total Visitor Counter

2475437
Share This Article