अतिवृष्टीग्रस्त शेतकरी-व्यापाऱ्यांसाठी तातडीने मदतीची मागणी
मुंबई:राज्यात अतिवृष्टी आणि परिणामी ओल्या दुष्काळामुळे शेतकरी आणि व्यापारी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले असतानाही राज्य सरकार मदत करण्यास विलंब करत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) यांच्या वतीने आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे तीव्र आंदोलन छेडण्यात आले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात कार्यकर्त्यांनी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना तातडीने भरपाई व दिलासा देण्याची मागणी लावून धरली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने यावेळी राज्य सरकारकडे ठोस मागण्या केल्या. यामध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करणे, जमिनीची माती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ५ लाख रुपये मदत, पिकांचे नुकसान झालेल्यांना एकरी ५० हजार रुपये भरपाई, तसेच घरे व दुकानांचे नुकसान झालेल्यांना ७०% भरपाई/मदत देण्याची मागणी प्रामुख्याने करण्यात आली.
शेतकरी आणि व्यापारी वर्गाला न्याय मिळालाच पाहिजे, त्यांच्या हक्काची मदत तातडीने मिळाली पाहिजे, अशी तीव्र प्रतिक्रिया या आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आली. राज्य सरकारने या मागण्या तात्काळ मान्य करून शेतकरी व व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश आणि जिल्ह्याचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या आंदोलनात उपस्थित होते.