तुषार पाचलकर / राजापूर
लातूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार व शिवसेना पक्ष समन्वयक मा. राजन साळवी यांनी लातूर जिल्ह्यातील शिवसेना, महिला आघाडी व युवासेनाच्या जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख यांची बैठक घेऊन झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला.
बैठकीनंतर साळवी यांनी लातूर जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा घुगे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीविषयी चर्चा केली. यामध्ये शेतीचे नुकसान, खरडून गेलेल्या जमिनी, घरांचे व जनावरांचे नुकसान, पंचनाम्यांतील अडचणी तसेच ICICI Lombard पीक विमा कंपनीविरुद्ध शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारींचा समावेश होता.
शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यात येत असलेल्या अडचणी, विमा कंपनीचे गैरप्रकार, गेल्या काही दिवसांपासून बंद असलेली E-KYC यंत्रणा, तसेच Farmer ID संदर्भातील तांत्रिक समस्या अशा विविध मुद्द्यांवरही सविस्तर चर्चा झाली.
या सर्व समस्यांवर जिल्हाधिकारी श्रीमती घुगे यांनी सकारात्मकता दाखवत, शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी योग्य ती पावले उचलली जातील, तसेच पीक विमा कंपनीला कठोर सूचना दिल्या असल्याचे सांगितले.
या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन दाने, शिवाजीराव माने, ॲड. ब्रम्हाजी केंद्रे, महिला जिल्हाप्रमुख जयश्री भुतेकर, अर्चना बिराजदार, युवासेना जिल्हाप्रमुख कुलदीप सूर्यवंशी, विजय कस्पटे, युवराज वंजारे, तसेच विविध तालुकाप्रमुख व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत माजी आमदार राजन साळवी यांची जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक
