संगमेश्वर: तालुक्यातील धामणीसह बारा गावांमध्ये युरिया खताचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
याबाबत तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांनी शुक्रवारपासून (ता. २७) तालुक्यात युरिया खताचा सुरळीत पुरवठा सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
तालुक्यातील कृषी केंद्रांवर सध्या युरियाच्या मागणीपेक्षा कमी साठा असल्याने शेतकऱ्यांना प्रत्यक्ष रांगेत उभे राहावे लागत आहे. काही ठिकाणी गैरसमज आणि अफवांमुळेही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नव्या साठ्याची वितरण प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्यात येणार आहे. ज्या गावांमध्ये तुटवडा अधिक आहे त्या गावांना प्राधान्याने खतपुरवठा केला जाणार आहे. शुक्रवारपासून युरिया खताचा सुरळीत पुरवठा सुरू होणार असून, शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. सर्व गावांमध्ये टप्प्याटप्प्याने खत पोहोचवले जाणार असल्याचे हेगडे यांनी सांगितले.
संगमेश्वरमध्ये आजपासून खतपुरवठा सुरळीत
